Latest NewsMaharashtrapolitics

गडचिरोलीत 3 लाख कोटींची गुंतवणूक, 1 लाख रोजगारांचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

“गडचिरोली जिल्हा आता केवळ महाराष्ट्राचा शेवटचा जिल्हा राहिलेला नाही, तर तो राज्याचे प्रगत ‘प्रवेशद्वार’ म्हणून ओळखला जाईल. जिल्ह्यातील समृद्ध खनिज संपत्ती आणि स्थानिक तरुणांचे कौशल्य यांच्या बळावर येथे 3 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक येत असून, त्यातून सुमारे 1 लाख रोजगाराच्या संधी निर्माण होतील,” असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला.


UATI संस्थेचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन

गडचिरोली जिल्ह्यातील अडपल्ली येथे गोंडवाना विद्यापीठ आणि लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड यांच्या सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून (PPP) स्थापन करण्यात आलेल्या विद्यापीठ तंत्रज्ञान संस्था (UATI) चे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.


मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमाला कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे सहपालकमंत्री अॅड. आशिष जयस्वाल, गृह (ग्रामीण) व खनिकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) छेरींग दोरजे, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, तसेच लॉयड्स मेटल्स अ‍ॅण्ड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बालसुब्रमण्यम प्रभाकरन उपस्थित होते.


ऐतिहासिक परिवर्तन: माओवादाकडून विकासाकडे

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गेल्या दहा वर्षांत गडचिरोलीचा चेहरा बदलण्यासाठी शासनाने जाणीवपूर्वक प्रयत्न केले. एकेकाळी माओवादग्रस्त आणि अतिमागास ओळख असलेला हा जिल्हा आता विकासाच्या मुख्य प्रवाहात आला आहे. पोलीस दलाच्या शौर्यामुळे आणि शासनाच्या ठोस धोरणांमुळे गडचिरोली लवकरच पूर्णतः माओवादमुक्त होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

“आता गडचिरोलीतील तरुणांच्या हातात शस्त्र नव्हे, तर आधुनिक शिक्षण आणि रोजगाराच्या संधी असतील,” असे मुख्यमंत्री म्हणाले.


उद्योग आणि शिक्षणाचा संगम : ‘UATI’

‘UATI’ संस्थेचे महत्त्व विशद करताना मुख्यमंत्री म्हणाले, “उद्योगांना आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ स्थानिक पातळीवरच तयार व्हावे, यासाठी ही संस्था स्थापन करण्यात आली आहे. उद्योग आणि शिक्षण क्षेत्राच्या समन्वयाचे हे एक आदर्श मॉडेल आहे.”

लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडने यासाठी 25 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी कंपनीचे विशेष कौतुक केले. या संस्थेत विद्यार्थ्यांसाठी मोफत शिक्षणासोबत निवास आणि प्रवासाची सुविधाही देण्यात येत आहे.


भविष्यातील गरजांनुसार अभ्यासक्रम

या संस्थेत मायनिंग, मेटलर्जी, संगणक विज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यांसारखे भविष्योन्मुख अभ्यासक्रम शिकवले जात असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले. विशेषतः ‘लँग्वेज लॅब’मुळे स्थानिक विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढल्याचे त्यांनी नमूद केले.

“केवळ चार महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर एका विद्यार्थिनीने इंग्रजीत आत्मविश्वासाने संवाद साधला. हे दृश्य गडचिरोलीच्या उज्ज्वल भविष्याची साक्ष देणारे आहे,” असे ते म्हणाले.


पोलीस दलासाठी 34 वाहनांचा ताफा

यानंतर गडचिरोली जिल्ह्यातील अंतर्गत सुरक्षा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने गडचिरोली पोलीस विभागाला 30 स्कॉर्पिओ वाहने, 2 बस आणि 2 मोटारसायकली, असा एकूण 34 वाहनांचा ताफा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून वितरित करण्यात आला.

यासोबतच गडचिरोली पोलीस विभागाच्या वाढीव विश्रामगृहाचे भूमिपूजनही मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले.


गडचिरोली महोत्सवात सहभाग

त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी गडचिरोली पोलीस विभागाच्या वतीने आयोजित ‘गडचिरोली महोत्सव’ या सांस्कृतिक कार्यक्रमातही सहभाग घेतला. या कार्यक्रमाला प्रशासकीय अधिकारी, विद्यापीठाचे सिनेट सदस्य, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button