कोकणाला मोठा धोका! इटलीत बंद पडलेली अत्यंत विषारी रसायन कंपनी महाराष्ट्रात सुरू; पर्यावरण व आरोग्यावर गंभीर संकट

स्वच्छ हवा, हिरवळ, निळाशार समुद्रकिनारे आणि निसर्गसौंदर्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या कोकणावर आता मोठा पर्यावरणीय धोका निर्माण झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे. इटलीत पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरल्याने जनआंदोलनातून बंद करण्यात आलेली एक विषारी रसायन कंपनी आता महाराष्ट्रात, थेट रत्नागिरी जिल्ह्यात उभारण्यात आल्याचा आरोप होत आहे. यामुळे कोकणातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इटलीमध्ये पर्यावरणीय प्रदूषणामुळे बंद करण्यात आलेली “पर्मनंट केमिकल” (PFAS) तयार करणारी कंपनी रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे परशुराम एमआयडीसी परिसरात स्थलांतरित करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे कोकणातील हवेची गुणवत्ता, जलस्रोत आणि सार्वजनिक आरोग्य यांना गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
इटलीत आंदोलन, न्यायालयीन कारवाईनंतर कंपनी बंद
इटलीतील विसेंझा शहरात ‘मिटेन’ या मूळ कंपनीद्वारे PFAS म्हणजेच “पर्मनंट केमिकल्स” तयार केली जात होती. तपासात या रसायनांच्या सांडपाण्यामुळे परिसरातील नद्या, भूजल आणि पिण्याचे पाणी मोठ्या प्रमाणावर दूषित झाल्याचे उघड झाले होते. स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याने इटलीत मोठ्या प्रमाणावर जनआंदोलने झाली. अखेर 2018 मध्ये ही कंपनी कायमस्वरूपी बंद करण्यात आली. इतकेच नव्हे तर पर्यावरण प्रदूषण प्रकरणात कंपनीच्या संचालक आणि अधिकाऱ्यांना स्थानिक न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.
महाराष्ट्रात पुनर्वसनावर प्रश्नचिन्ह
इटलीत निर्बंध, न्यायालयीन कारवाई आणि बंदी असतानाही या कंपनीला महाराष्ट्रात परवानगी कशी मिळाली, यावर आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. रत्नागिरीतील लोटे औद्योगिक वसाहतीत लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीच्या माध्यमातून या रसायन उत्पादनाची यंत्रणा हलवण्यात आल्याचा दावा केला जात आहे. इटलीत बंदी असलेली PFAS रसायने आता कोकणात तयार होणार असल्याने स्थानिक नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक संघटनांमध्ये तीव्र नाराजी आहे.
PFAS रसायनांचे गंभीर परिणाम
तज्ज्ञांच्या मते, PFAS ही “कायमस्वरूपी रसायने” असून ती नैसर्गिकरित्या विघटित होत नाहीत. ही रसायने पाण्यात दीर्घकाळ टिकून राहतात आणि अन्नसाखळीमार्फत मानवी शरीरात प्रवेश करतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होणे, थायरॉईड विकार, प्रजनन समस्या, मुलांच्या वाढीवर परिणाम, वाढलेले कोलेस्टेरॉल व रक्तदाब, तसेच मूत्रपिंड आणि टेस्टिक्युलर कर्करोगाचा धोका वाढतो, असा इशारा तज्ज्ञ देत आहेत.
कोकणात विरोधाची लाट
नैसर्गिकदृष्ट्या संवेदनशील आणि दाट लोकवस्तीच्या कोकण पट्ट्यात अशा धोकादायक रासायनिक प्रकल्पांना परवानगी देण्यावरून राज्य सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कोकणात आधीच पेट्रोकेमिकल प्रकल्प, रिफायनरी यांसारख्या उद्योगांना विरोध सुरू असताना, आता या विषारी रसायन प्रकल्पामुळे संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
कोकणाच्या पर्यावरण, आरोग्य आणि भविष्यासाठी हा प्रकल्प तात्काळ रद्द करावा, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि पर्यावरण अभ्यासकांकडून जोर धरू लागली आहे.



