नागपूरमध्ये भीषण अपघात टँकरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

नागपूर
नागपूर शहरातून एक दुर्दैवी अपघाताची घटना समोर आली आहे. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत भरधाव टँकरच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत टँकरसह चालकाला ताब्यात घेतले आहे.
पाचपावली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक युनूस शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात 27 डिसेंबर रोजी सायंकाळी सुमारे सात वाजताच्या सुमारास घडला. एका भरधाव टँकरने दुचाकीला जोरदार धडक दिली, यात दुचाकीस्वाराचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच पाचपावली पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अपघातग्रस्त टँकर आणि त्याचा चालक ताब्यात घेतला असून, चालकाविरोधात संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अपघात नेमका कसा झाला, टँकरचा वेग किती होता आणि निष्काळजीपणा झाला का, याचा पुढील तपास पाचपावली पोलीस करत आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक युनूस शेख यांनी दिली आहे.



