नागपुरात एम.डी. अमली पदार्थ विक्रीविरोधात पोलिसांची मोठी कारवाई

पाचपावली पोलिसांकडून दोन सराईत गुन्हेगार अटकेत; ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त
नागपूर
नागपूर शहरात अमली पदार्थ विक्रीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत एम.डी. म्हणजेच मेफेड्रोन या अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. पाचपावली पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने ही कारवाई करत तब्बल ५७ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग सुरू असताना तपास पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार २४ डिसेंबर २०२५ रोजी पहाटे ३.०५ ते ३.२० वाजताच्या दरम्यान लालगंज, मेहदीबाग येथील चकना चौक परिसरात, श्री अमरनाथ बँडजवळ पोलिसांनी सापळा रचला.
या कारवाईत राहील खान वल्द सिराज खान (वय ३५, रा. मोमीनपुरा, अंसारनगर, इदगाह, चांद हॉटेलजवळ, नागपूर) यास ताब्यात घेण्यात आले. एन.डी.पी.एस. कायद्यानुसार पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्याकडे ८.९३ मिलीग्रॅम एम.डी. (मेफेड्रोन) अमली पदार्थ आढळून आला. या अमली पदार्थाची अंदाजे किंमत ४५ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
यासोबतच आरोपीकडून विवो कंपनीचा मोबाईल फोन (किंमत १० हजार रुपये) तसेच २ हजार ३०० रुपये रोख रक्कम असा एकूण ५७ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पाचपावली पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायद्याच्या कलम ८(क), २२(ब) आणि २९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपासात आरोपीने दिलेल्या माहितीनुसार सलाम वल्द शेख कलाम (वय ३६, रा. मोमीनपुरा, अंसारनगर, नागपूर) यालाही अटक करण्यात आली आहे. सलाम शेख हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर इमामवाडा, पाचपावली, तहसील आणि कपीलनगर पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायद्यान्वये अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
सध्या दोन्ही आरोपी न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस कोठडीत असून या अमली पदार्थ विक्रीच्या साखळीचा अधिक तपास पाचपावली पोलीस करत आहेत. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.



