ठाकरेंचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेनंतर तब्बल 19 वर्षांनी ठाकरे बंधू—मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे—राजकीय पटलावर एकत्र आले आहेत. संयुक्त पत्रकार परिषदेत युतीची घोषणा झाल्यानंतर सर्वांचे लक्ष जागावाटपाकडे लागले होते. आठवडाभर चाललेल्या चर्चेनंतर अखेर दादर-प्रभादेवीतील दोन वॉर्डवरील तिढा सुटला असला, तरी या निर्णयात दोन्ही बाजूंच्या निकटवर्तीयांचा राजकीय बळी गेल्याची चर्चा सुरू झाली आहे.
वॉर्ड 192 : दादर मनसेकडे, उद्धवसेनेचा सीटिंग आमदार बाजूला
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दादर-प्रभादेवी हा ठाकरे गटांचा बालेकिल्ला मानला जातो. येथे वॉर्ड क्रमांक 192 आणि 194 या दोन जागांवरून जागावाटपाचा तिढा निर्माण झाला होता. अखेर वॉर्ड 192 ही जागा मनसेला देण्यात आली.
या निर्णयासाठी उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षातील सीटिंग नगरसेवक प्रकाश पाटणकर यांचा राजकीय बळी दिला. मनसेकडून यशवंत किल्लेदार यांच्यासाठी राज ठाकरे यांनी ही जागा प्रतिष्ठेचा मुद्दा बनवला होता.
वॉर्ड 194 : प्रभादेवी उद्धवसेनेकडे, मनसेच्या माजी नगरसेवकाला फटका
प्रभादेवीतील वॉर्ड क्रमांक 194 मधून शिंदे गटातील माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाकडून आमदार सुनील शिंदे यांचे बंधू निशिकांत शिंदे यांना उमेदवारी निश्चित झाली आहे.
या जागेसाठी मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी यांना शब्द देण्यात आला होता. मात्र अचानक ठाकरे सेनेकडून दावा करण्यात आल्याने संतोष धुरी यांचा राजकीय बळी गेला.
संदीप देशपांडे नाराज?
या साऱ्या प्रक्रियेत मनसे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे नाराज झाल्याची जोरदार चर्चा आहे. संतोष धुरी यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे आणि निवड प्रक्रियेतून संदीप देशपांडे यांना दूर ठेवल्यामुळे असंतोष वाढल्याचं सांगितलं जात आहे. संदीप देशपांडे हे राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात.
अखेरच्या टप्प्यात दोन्ही बाजूंनी प्रत्येकी एक जागा सोडत तिढा सुटला असला, तरी अंतर्गत नाराजीचे पडसाद उमटत असल्याचं चित्र आहे.
उद्धव–राज युतीचा 67 प्रभागांवर परिणाम
उमेदवारी अर्ज भरण्यास अवघे दोन दिवस शिल्लक असतानाही ठाकरे बंधूंनी अधिकृत जागावाटप जाहीर केलेले नाही. मात्र, उद्धवसेना–मनसे युतीमुळे मुंबईतील तब्बल 67 प्रभागांमध्ये दोन्ही पक्षांची ताकद वाढल्याचं चित्र आहे.
2024 च्या विधानसभा निवडणुकीत मनसेने मुंबईत 25 उमेदवार उभे केले होते.
- शिवडी मतदारसंघात उद्धवसेनेचे अजय चौधरी आणि मनसेचे बाळा नांदगावकर आमनेसामने होते.
- उर्वरित 24 मतदारसंघांत मनसेने महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांना थेट लढत दिली होती.
- यापैकी 19 मतदारसंघांत मनसे आणि उद्धवसेना एकमेकांविरोधात होते.
आकडे काय सांगतात?
प्रभागनिहाय मतांच्या आकडेवारीनुसार—
- मराठीबहुल वरळी, शिवडी, माहीम, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप अशा विधानसभा क्षेत्रांतील 67 प्रभागांपैकी 39 प्रभागांत मविआ,
- तर 28 प्रभागांत महायुती आघाडीवर होती.
विशेष म्हणजे, समाधान सरवणकर यांनी आघाडी घेतलेल्या 191 आणि 192 प्रभागांमध्ये मनसे व उद्धवसेनेच्या मतांची एकत्रित बेरीज त्यांच्या मतांपेक्षा जवळपास दुप्पट आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंची युती मुंबई महापालिका निवडणुकीत निर्णायक ठरू शकते, असा राजकीय अंदाज वर्तवला जात आहे.



