खेकडे पकडण्यासाठी धरणात गेलेल्या मामासह दोन अल्पवयीन भाच्यांचा बुडून मृत्यू

मंगरूळपीर तालुक्यातील सनगाव परिसरात दुर्दैवी घटना
वाशीम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यातील सनगाव परिसरात खेकडे पकडण्यासाठी धरणात गेलेल्या मामासह दोन अल्पवयीन भाच्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या घटनेत सनगाव येथील सिद्धार्थ बनसोड (वय ३५) आणि त्यांचे दोन भाचे अंकुर राजेंद्र भालेराव (वय १५) व कार्तिक राजेंद्र भालेराव (वय १२) यांचा मृत्यू झाला आहे. अंकुर आणि कार्तिक हे सख्खे भाऊ असून, शाळेला नाताळची सुटी असल्याने ते मामासोबत दुपारच्या सुमारास धरणात खेकडे पकडण्यासाठी गेले होते.
मात्र सायंकाळ झाली तरीही हे तिघे घरी न परतल्याने कुटुंबीयांनी व गावकऱ्यांनी त्यांचा शोध सुरू केला. शोधादरम्यान धरणाच्या काठावर तिघांचे कपडे आढळून आल्याने ते पाण्यात बुडाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. धरणातील पाणी खोल असल्याने आणि अंधार पडल्यामुळे रात्री शोध मोहीम थांबवण्यात आली.
आज सकाळी पिंजर येथील संत गाडगेबाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे आणि त्यांच्या चमूने धरणात शोध मोहीम राबवली. यावेळी प्रथम दोन अल्पवयीन भावांचे, तर काही अंतरावरून त्यांच्या मामांचा मृतदेह खोल पाण्यातून बाहेर काढण्यात आला.
या हृदयद्रावक घटनेमुळे भालेराव व बनसोड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण सनगाव परिसरात शोककळा पसरली आहे. घटनेचा पुढील तपास आसेंगाव पोलीस करत आहेत.



