electionLatest NewsMaharashtra

मनपा निवडणुकीत एमआयएम २० जागा जिंकणार; उपमहापौरही एमआयएमचाच होणार – हाजी इरफान भाई

अमरावती | प्रतिनिधी

आगामी अमरावती महानगरपालिका निवडणुकीत एमआयएम पक्ष किमान २० जागा जिंकणार असून, यावेळी उपमहापौरपदही एमआयएमकडे येईल, असा दावा एमआयएमचे नेते हाजी इरफान भाई यांनी केला आहे.

हाजी इरफान भाई यांनी सांगितले की, २०१८ च्या मनपा निवडणुकीत एमआयएमचे १० नगरसेवक निवडून आले होते. यावेळी पक्ष २५ ते ३० जागांवर उमेदवार उभे करत असून, जनतेचा प्रतिसाद पाहता यावेळी यशाचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अमरावती शहराच्या पश्चिम भागात आजही पाणी, रस्ते, स्वच्छता यांसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचा आरोप त्यांनी केला. “निवडणुकीच्या वेळी मुस्लिम मतांची गरज भासते, मात्र विकासनिधी वाटपात सातत्याने भेदभाव केला जातो,” असा गंभीर आरोप त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर केला.

नागपुरी गेट पुलाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, सत्ताधाऱ्यांनी या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही त्यांनी केला.

यावेळी मनपेत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नसल्याचा दावा करत, एमआयएमचे नगरसेवक ‘किंगमेकर’ ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, यावेळी एमआयएमचा उपमहापौर होणारच, असा ठाम दावा हाजी इरफान भाई यांनी केला.

अमरावती मनपा निवडणुकीसाठी एमआयएम पूर्ण ताकदीने सज्ज असून, शहरातील दुर्लक्षित भागांच्या विकासासाठी पक्ष कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button