पवनी पंचायत समितीच्या उपसभापतीवर ७८ वर्षीय वृद्धाला भररस्त्यात चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप

तक्रार देऊनही पोलीस कारवाई नसल्याने नागरिकांमध्ये संताप
भंडारा | प्रतिनिधी
भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली असून, ७८ वर्षीय वृद्धाला भररस्त्यात चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप थेट पवनी पंचायत समितीच्या उपसभापतीवर करण्यात आला आहे. ही घटना अपघात नसून जाणीवपूर्वक केलेला जीवघेणा हल्ला असल्याचा दावा पीडित कुटुंबीयांनी केला आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणी तक्रार दाखल करूनही पोलीस कारवाई होत नसल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
ही घटना पवनी तालुक्यातील विरली खंदार येथे दि. २१ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घडली. विस्तारी रामकृष्ण ब्राह्मणकर (वय ७८) हे पत्नी शालिनी ब्राह्मणकर यांच्यासोबत दुर्गा उत्सव मंडळाच्या सभेला जात असताना, एक भरधाव चारचाकी वाहन थेट त्यांच्या दिशेने आल्याचा आरोप आहे.
तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, संबंधित चारचाकी वाहन पवनी पंचायत समितीचे उपसभापती प्रमोद मारुती मेंढे चालवत होते. आरोपीने मुद्दाम वेग वाढवून वृद्धाला धडक देण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात वृद्धाचा थोडक्यात जीव वाचला असला तरी त्यांना गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
पीडित वृद्धांनी सांगितले की, या घटनेमागे पूर्ववैमनस्य असून, सुमारे एक वर्षापूर्वी आरोपीने दारूच्या नशेत “कुठेही दिसलास तर तुला जिवंत सोडणार नाही” अशी उघड धमकी दिली होती. या पार्श्वभूमीवर ही घटना केवळ अपघात नसून नियोजित हल्ला असल्याचा कुटुंबीयांचा ठाम दावा आहे.
या प्रकरणी दि. १ ऑक्टोबर २०२५ रोजी अड्याळ पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप पीडितांनी केला आहे. “माझ्या जीवाला थेट धोका आहे. काही अनुचित घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार?” असा थेट सवाल वृद्ध विस्तारी ब्राह्मणकर यांनी प्रशासनाला केला आहे.
या घटनेमुळे विरली खंदार गावात भीतीचे वातावरण पसरले असून, पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. आरोपीविरोधात तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.



