नांदेड–लोहा मार्गावर धावत्या चारचाकीला अचानक आग; वाहन पूर्णपणे जळून खाक

नांदेड | प्रतिनिधी
नांदेड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली असून, धावत्या चारचाकी वाहनाला अचानक आग लागल्याने संपूर्ण गाडी जळून खाक झाली. ही घटना आज रात्री नांदेड–लोहा मार्गावरील सोनखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री सोनखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत नांदेड–लोहा महामार्गावर सोनखेड जवळ ही घटना घडली. कलंबर फाट्याजवळ संबंधित चारचाकी वाहन रस्त्यावरील दुभाजकावर आदळले. अपघातानंतर काही क्षणातच वाहनाला अचानक आग लागली.
आगीची तीव्रता इतकी मोठी होती की काही मिनिटांतच संपूर्ण वाहन आगीच्या भक्षस्थानी सापडले आणि चारचाकी पूर्णपणे जळून खाक झाली. घटनेच्या वेळी वाहनात एकच व्यक्ती असल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र त्या व्यक्तीची प्रकृती किंवा स्थिती याबाबत पोलिसांकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
घटनेची माहिती मिळताच सोनखेड पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने तत्काळ कारवाई करत आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेमुळे काही काळ नांदेड–लोहा मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
अपघात नेमका कशामुळे झाला, तसेच वाहनाला आग कशामुळे लागली, याचा पुढील तपास सोनखेड पोलीस करत आहेत.



