सोसणार नाही इतकी कडाक्याची थंडी; महाराष्ट्रात पुढचे 24 तास हाडं गोठवणारे

उत्तरेकडील राज्यांमध्ये सक्रिय झालेल्या शीतलहरींचा प्रभाव आता देशभर जाणवू लागला असून, महाराष्ट्रातही कडाक्याच्या थंडीने पुन्हा एकदा जोर धरला आहे. राज्यातील काही भागांमध्ये किमान तापमान थेट 4.5 अंश सेल्सिअसपर्यंत घसरल्याची नोंद झाली आहे. डिसेंबर महिन्याच्या अखेरीस आणि नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर थंडी आणखी वाढण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
महाराष्ट्रात थंडीची लाट; कुठे आहे सर्वाधिक गारठा?
उत्तर भारतातून येणाऱ्या शीतलहरींनी मध्य, पूर्व आणि दक्षिण भारताच्या दिशेने मार्गक्रमण सुरू केले आहे. उत्तरेकडून वाहणाऱ्या गार वाऱ्यांमुळे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा एकदा थंडीची लाट सक्रिय झाली आहे. नाताळ सणाचा आठवडा पाहता संपूर्ण आठवडाभर गारठा कायम राहण्याची शक्यता असून, आठवड्याच्या शेवटी तापमानात किंचित वाढ होऊ शकते. त्यामुळे नववर्षाचे स्वागत काहीसे उबदार वातावरणात होईल, असा प्राथमिक अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
कोकण ते विदर्भ; सर्वत्र गारठ्याचं साम्राज्य
सध्या कोकण, विदर्भ, मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्रात थंडीची तीव्रता कायम आहे. अनेक भागांमध्ये किमान तापमान 10 अंशांच्या खाली घसरले असून, काही ठिकाणी तापमान 12 ते 14 अंशांदरम्यान नोंदवले जात आहे. घाटमाथ्यावरील भागांमध्ये पहाटेच्या वेळी दाट धुके आणि दवबिंदूंची चादर पाहायला मिळत असून, निसर्गाचे विलोभनीय रूप अनुभवायला मिळत आहे.
हिवाळी पर्यटनासाठी सुवर्णसंधी
हिवाळी पर्यटनासाठी हा काळ उत्तम ठरत असून, थंडीचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणावर घाटमाथ्यावरील ठिकाणी गर्दी करताना दिसत आहेत. मात्र, वाढत्या थंडीमुळे नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
पुढचे 48 तास महत्त्वाचे
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील 24 तासांत थंडीच्या लाटेची तीव्रता किंचित कमी होईल, मात्र गारठा कायम राहणार आहे. पुढील 48 तास तापमानात घट सुरूच राहणार असल्याने मुंबई शहर आणि उपनगरांमध्येही गार वाऱ्यांचा त्रास वाढण्याची शक्यता आहे.
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’चा प्रभाव
दरम्यान, काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ या अतिथंडीच्या 40 दिवसांच्या पर्वाला 21 डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. या काळात तापमान उणे अंशांपर्यंत घसरते. काश्मीरमधील या थंडीचा परिणाम आता महाराष्ट्र ओलांडून तेलंगणा आणि कर्नाटकपर्यंत पोहोचत असून, पूर्वोत्तर भारतात काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता वगळता गारठा कायम राहील, असा अंदाज भारतीय हवामान विभाग (IMD) यांनी व्यक्त केला आहे.



