राज ठाकरेंनी पुन्हा साधला ‘9’ चा मुहूर्त!

मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडणार असून, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांची मनसे युतीची अधिकृत घोषणा उद्या, 24 डिसेंबर रोजी होणार आहे. या घोषणेमागे पुन्हा एकदा राज ठाकरेंचा ‘लकी नंबर 9’ असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून दोन्ही पक्षांमध्ये सातत्याने बैठका, चर्चा आणि जागावाटपावर वाटाघाटी सुरू होत्या. त्यामुळे आजच युतीची घोषणा होईल, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र अखेर 24 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता युतीची घोषणा होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
संजय राऊतांनी काय जाहीर केलं?
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी आपल्या एक्स (X) अकाऊंटवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकमेकांना पुष्पगुच्छ देत असल्याचा फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत त्यांनी केवळ
“उद्या 12 वाजता”
अशी कॅप्शन दिली असून, त्यातूनच युतीच्या घोषणेचा मुहूर्त स्पष्ट झाला आहे.
24 डिसेंबर आणि ‘9’ चा थेट कनेक्शन
उद्याच्या तारखेत ‘9’ हा अंक वारंवार समोर येत असल्याने, ही तारीख मुद्दाम निवडली गेली का? अशी चर्चा रंगली आहे.
- तारीख व महिना:
24/12 → 2 + 4 + 1 + 2 = 9 - वर्ष:
2025 → 2 + 0 + 2 + 5 = 9 - दोन्ही 9 ची बेरीज = 18 → 1 + 8 = 9
म्हणजेच, संपूर्ण तारखेत ‘9’ चं वर्चस्व स्पष्टपणे दिसून येतं.
राज ठाकरेंचा ‘9’ आणि राजकीय निर्णयांचा इतिहास
राज ठाकरे हे अंकशास्त्रावर (Numerology) विश्वास ठेवतात, हे याआधी अनेकदा दिसून आलं आहे. त्यांच्या अनेक महत्त्वाच्या राजकीय निर्णयांचा थेट संबंध ‘9’ या अंकाशी आहे.
🔹 गाड्यांचे नंबर:
राज ठाकरेंच्या बहुतांश गाड्यांचे नंबर 9 ने संपतात किंवा त्यांची बेरीज 9 येते.
🔹 शिवसेनेतून बाहेर पडण्याची घोषणा:
27 नोव्हेंबर 2005
→ 2 + 7 = 9
→ 1 + 1 + 2 + 0 + 0 + 5 = 9
🔹 पहिल्या सभा:
- 18 डिसेंबर 2005 → 1 + 8 = 9
- 18 मार्च 2006 → 1 + 8 = 9
🔹 मनसेची स्थापना:
9 मार्च 2006 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना
→ पक्ष स्थापनेसाठीही 9 चाच मुहूर्त
🔹 निवडणूक प्रचार:
अनेकदा प्रचाराची सुरुवात 9, 18 किंवा 27 तारखेला केल्याचं दिसून आलं आहे.
🔹 मोर्चा:
9 फेब्रुवारी 2020 रोजी बांगलादेशी व पाकिस्तानी घुसखोरांविरोधात मोर्चा
→ हिंदुत्व भूमिकेनंतरचा पहिला मोठा मोर्चा
वैयक्तिक आयुष्यातही ‘9’ चं महत्त्व
राज ठाकरेंनी केवळ राजकारणातच नाही, तर वैयक्तिक आयुष्यातही 9 ला महत्त्व दिलं आहे.
- अमित ठाकरेंचं लग्न:
तारीख – 27 जानेवारी → 2 + 7 = 9 - लग्नाचा मुहूर्त:
12:51 वाजता → 1 + 2 + 5 + 1 = 9
उद्याची घोषणा – राजकारणातील टर्निंग पॉइंट?
उद्याची शिवसेना–मनसे युतीची घोषणा केवळ राजकीयदृष्ट्या नाही, तर अंकशास्त्रीयदृष्ट्याही खास ठरत आहे. ‘9’ या अंकाशी जोडलेला हा निर्णय मुंबई महानगरपालिका निवडणुकांमध्ये काय परिणाम घडवतो, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.



