राज्यात रस्ता अपघातांतील मृत्यूदरात घट; परिवहन विभागाच्या उपाययोजनांना यश

महाराष्ट्र राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन विभागामार्फत सातत्याने राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. नोव्हेंबर २०२५ पर्यंतच्या आकडेवारीनुसार राज्यातील रस्ता अपघातांमधील मृत्यूदरात लक्षणीय घट नोंदविण्यात आली असून, ही बाब दिलासादायक असल्याचे चित्र समोर आले आहे.
अपघात वाढले, पण मृत्यू कमी
जानेवारी ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत राज्यात एकूण ३३,००२ रस्ता अपघात झाले असून, त्यामध्ये १४,०६६ जणांचा मृत्यू झाला आहे. मागील वर्षी याच कालावधीत ३२,७८४ अपघातांत १४,१८५ मृत्यू नोंदविण्यात आले होते. तुलनात्मक पाहता अपघातांची संख्या २१८ ने (०.६६ टक्के) वाढली असली, तरी अपघाती मृत्यूंची संख्या ११९ ने म्हणजेच ०.८३ टक्क्यांनी घटली आहे. मृत्यूदरातील ही घट रस्ता सुरक्षा उपाययोजनांचे यश दर्शवते.
मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर मोठी घट
मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरही अपघाती मृत्यूंमध्ये मोठी घट झाल्याचे समोर आले आहे. जानेवारी ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीत येथे ८२ अपघाती मृत्यू झाले होते, तर २०२५ मध्ये ही संख्या ६१ वर आली आहे. म्हणजेच २१ मृत्यूंनी (२६ टक्के) घट झाली आहे. याचबरोबर अपघातांची संख्या ६६ वरून ५४ इतकी कमी झाली असून, त्यामध्ये १८ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे.
काही जिल्ह्यांमध्ये लक्षणीय सुधारणा
परिवहन विभागाच्या माहितीनुसार, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अपघाती मृत्यूंच्या संख्येत विशेष घट दिसून आली आहे.
- नागपूर शहर – २१ टक्के
- पालघर – २० टक्के
- अमरावती – १७ टक्के
- पुणे – १५ टक्के
- धुळे – १४ टक्के
- छत्रपती संभाजीनगर – १२ टक्के
या जिल्ह्यांमध्ये रस्ता सुरक्षा उपाययोजनांचा प्रभावी परिणाम दिसून येत असल्याचे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे.
२०३० पर्यंत अपघात ५० टक्क्यांनी कमी करण्याचे लक्ष्य
राज्यातील रस्ता अपघातांची संख्या सन २०३० पर्यंत ५० टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट परिवहन विभागाने निश्चित केले आहे. यासाठी भविष्यात अधिक कडक आणि प्रभावी रस्ता सुरक्षा उपाययोजना राबविण्यात येणार असल्याचेही विभागाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, राज्यातील सर्व वाहनचालक आणि पादचारी नागरिकांनी वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळावेत, सुरक्षित वाहनचालन करावे आणि अपघात टाळण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन परिवहन विभागामार्फत करण्यात आले आहे.



