बळजबरीने लग्न, बलात्कार, ओळखही लपवली; डॉन हाजी मस्तानच्या लेकीची पंतप्रधान मोदींकडे न्यायासाठी साद

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमुळे मुंबईच्या अंडरवर्ल्डशी जोडलेलं एक नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. मुंबईचा पहिला डॉन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हाजी मस्तान मिर्झाची लेक असल्याचा दावा करणारी हसीन मस्तान मिर्झा हिने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे न्यायाची मागणी केली आहे.
हसीन मस्तान मिर्झाच्या आरोपांमुळे खळबळ उडाली असून, तिने आपल्या आयुष्यात घडलेल्या धक्कादायक घटनांचा पर्दाफाश सोशल मीडियावरून केला आहे.
कोण आहे हसीन मस्तान मिर्झा?
आपण डॉन हाजी मस्तान यांची मुलगी असल्याचा दावा करत हसीन मस्तान मिर्झा सध्या चर्चेत आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओत तिने आपल्या आयुष्यातील वेदनादायक अनुभव कथन केले असून, बळजबरीने लग्न, लैंगिक अत्याचार आणि संपत्ती हडप केल्याचे गंभीर आरोप केले आहेत.
अल्पवयीन असताना बळजबरीने लग्न
हसीनच्या म्हणण्यानुसार, 1996 साली ती अल्पवयीन असताना तिचं मामाच्या मुलाशी जबरदस्तीने लग्न लावण्यात आलं. या काळात तिच्यावर वारंवार बलात्कार करण्यात आला. तसंच, पती आणि त्याच्या कुटुंबीयांनी संपत्ती मिळवण्यासाठी तिच्या ओळखीचा गैरवापर केला आणि बाहेरील लोकांपासून तिची खरी ओळख लपवून ठेवली, असा दावा तिने केला आहे.
इतकंच नव्हे तर, ज्या व्यक्तीशी तिचं लग्न लावण्यात आलं होतं, त्या व्यक्तीचं आधीच आठ महिलांशी लग्न झालं होतं, असा धक्कादायक आरोपही हसीनने केला आहे.
आत्महत्येचे तीन प्रयत्न
सततच्या अत्याचारांमुळे मानसिक ताण सहन न झाल्यानं आपण तीन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचं हसीननं सांगितलं. एका वृत्तसंस्थेशी बोलताना ती म्हणाली,
“माझ्यावर बलात्कार झाला, मला मारण्याचा प्रयत्न झाला, अल्पवयीन असताना माझं लग्न लावण्यात आलं आणि माझी संपत्ती हिसकावण्यात आली. इतकं सगळं करूनही आरोपी मोकाट फिरत आहेत. कायदा कठोर असला पाहिजे, तरच गुन्हेगारांच्या मनात भीती बसेल.”
‘मला त्या व्यक्तीला शिक्षा द्यायची आहे’
हसीननं स्पष्ट शब्दांत सांगितलं की,
“ज्याने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला, तिला मरण्यासाठी सोडलं, त्या व्यक्तीला शिक्षा झालीच पाहिजे. तेव्हा मी लहान होते, माझ्याकडे कोणीही नव्हतं. आज मी सजाण आहे आणि न्याय मागते आहे.”
वडिलांचं नाव वादात ओढू नका – हसीनची विनंती
या प्रकरणामुळे हाजी मस्तान यांचं नाव पुन्हा चर्चेत आल्यानं हसीननं स्पष्ट भूमिका मांडली आहे.
हाजी मस्तान यांचं निधन 25 जून 1994 रोजी झालं असून, या घटनेचा त्यांच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनी संबंध असल्याचं तिने सांगितलं. वडिलांविषयी गैरसमज पसरवू नयेत, अशी विनंतीही तिने केली आहे.
हसीन खरंच हाजी मस्तानची लेक आहे का?
दरम्यान, या प्रकरणाला आणखी वळण मिळालं आहे. हाजी मस्तान यांची पत्नी सोना मस्तान यांनी हसीन ही हाजी मस्तान यांची मुलगी नसल्याचं वक्तव्य केल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे हसीनचा दावा कितपत सत्य आहे, याबाबत संभ्रम निर्माण झाला असून, या संपूर्ण प्रकरणाचं सत्य काय आहे हे तपासातूनच स्पष्ट होणार आहे.



