दोन्ही NCPची युती नकोच!

पुण्यातील आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांमध्ये युतीच्या हालचाली सुरू असतानाच शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. या युतीला सुरुवातीपासून तीव्र विरोध करणारे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा प्रस्ताव पक्षाकडे पाठवला आहे.
पवारांशी थेट चर्चा
दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येण्यास स्पष्ट विरोध दर्शवणाऱ्या प्रशांत जगताप यांना स्वतः शरद पवार यांनी सोमवारी पुण्याहून मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी चर्चेसाठी बोलावून घेतले होते. या भेटीत काही तास दोन्ही बाजूंमध्ये सखोल चर्चा झाली. मात्र, युतीबाबत आपली भूमिका बदलण्यास जगताप तयार नसल्याचं समोर आलं आहे.
युती झाली तर तात्पुरता राजकीय संन्यास
प्रशांत जगताप यांनी यापूर्वीच पक्षाला इशारा दिला होता की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये जर दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र आले, तर ते काही काळासाठी राजकारणातून बाहेर पडतील किंवा निवडणूक लढवणार नाहीत.
त्यांची ठाम भूमिका अशी आहे की, शरद पवार गटाने निवडणूक ‘तुतारी’ चिन्हावरच लढवावी. अजित पवार गटाच्या ‘घड्याळ’ चिन्हावर उमेदवार देण्यास त्यांनी स्पष्ट विरोध दर्शवला आहे.
सुप्रिया सुळेंकडे सोपवला राजीनामा प्रस्ताव
दोन्ही राष्ट्रवादी गटांमधील युतीसंदर्भातील चर्चेसाठी स्थापन केलेल्या समितीतून वगळण्यात आल्यानंतर आणि सुरू असलेल्या युतीच्या चर्चांमुळे नाराज होऊन प्रशांत जगताप यांनी पुणे शहराध्यक्षपदाचा राजीनामा प्रस्ताव खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे सुपूर्द केला आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
दरम्यान, प्रशांत जगताप हे काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
अजित पवारांचे काँग्रेसलाही सोबत घेण्याचे प्रयत्न
नगरपरिषद निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सकाळी अजित पवार यांनी काँग्रेस नेते व पुणे प्रभारी सतेज पाटील यांच्याशी फोनवर संपर्क साधला. पुणे महानगरपालिकेत राष्ट्रवादीसोबत येण्यासंदर्भात प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती आहे.
या चर्चेला स्वतः सतेज पाटील यांनी दुजोरा दिला आहे.
अजित पवारांकडून शरद पवार गट आणि काँग्रेस यांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू असून, पुण्यात स्वबळाची भूमिका घेणाऱ्या भाजपाला त्यांच्या शैलीत उत्तर देण्यासाठी राजकीय हालचाली वेगाने सुरू झाल्याचं स्पष्ट होत आहे.



