AmravatiLatest News

अमरावती महापालिकेत माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समितीची बैठक; निवडणूक पारदर्शक ठेवण्यासाठी आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांचे मार्गदर्शन

सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निर्भीड व नियमबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी मंगळवार, दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी महानगरपालिकास्तरीय माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती (MCMC) ची सविस्तर बैठक घेतली. ही बैठक अमरावती महानगरपालिका कॉन्फरन्स हॉल मध्ये पार पडली.

बैठकीदरम्यान आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी निवडणूक आचारसंहिता अंमलबजावणीदरम्यान माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे नमूद केले. इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर प्रसारित होणाऱ्या निवडणूकविषयक जाहिराती, बातम्या, प्रचार साहित्य व आशयाचे प्रमाणन आणि संनियंत्रण कसे करावे, यावर सखोल चर्चा करण्यात आली.

आयुक्तांनी पेड न्यूज, दिशाभूल करणाऱ्या जाहिराती, तथ्यहीन माहिती तसेच मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या आशयावर काटेकोर नजर ठेवण्याचे निर्देश दिले. तसेच, निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोणतीही राजकीय जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समितीची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असल्याचे अधोरेखित केले.

सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावाचा विचार करून फेसबुक, एक्स (ट्विटर), इन्स्टाग्राम, युट्यूब व इतर डिजिटल माध्यमांवरील प्रचार, व्हिडिओ, पोस्ट व जाहिरातींचे निरीक्षण करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा अधिक सक्रिय ठेवण्याचे निर्देश देखील यावेळी दिले. निवडणूक काळात आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची दक्षता घेण्यासाठी समितीने नियमित आढावा बैठकांचे आयोजन करून त्वरित कारवाई करावी, असे सांगण्यात आले.

आयुक्तांनी माध्यम प्रतिनिधींना आवाहन केले की, निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व विश्वासार्ह राहावी, म्हणून वस्तुनिष्ठ पत्रकारिता करावी आणि कोणताही नियमभंग आढळल्यास तात्काळ अहवाल सादर करावा.

बैठकीस उपस्थित होते:
अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समितीचे सदस्य, आचारसंहिता कक्ष प्रमुख राम लंके, जिल्हा माहिती अधिकारी गजानन कोटुरवार, अमरावती आकाशवाणी कार्यक्रम अधिकारी आशिष गावंडे, पोलीस निरीक्षक निलेश करे, सदस्य सचिव व जनसंपर्क अधिकारी भुषण पुसतकर.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button