electionLatest NewsMaharashtraMaharashtra Politics

महाराष्ट्रातील 246 नगरपरिषद जागांचे निकाल आज

न्यायालयीन स्थगितीनंतर आज निकाल जाहीर; विदर्भाकडे सर्वांचे लक्ष

महाराष्ट्रातील 246 नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार आहेत. न्यायालयीन स्थगितीनंतर 2 डिसेंबर रोजी झालेल्या मतदानाचा निकाल आज, 21 डिसेंबर रोजी जाहीर केला जात असून, राज्यभरात मतमोजणीला सकाळी 10 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे.

मतमोजणीची प्रक्रिया प्रथम पोस्टल मतपत्रिकांपासून सुरू झाली असून, त्यानंतर ईव्हीएमद्वारे मतदानाची मोजणी केली जात आहे. सहा ते आठ फेऱ्यांमध्ये मतमोजणी पूर्ण होणार असून, दुपारपर्यंत बहुतेक ठिकाणचे निकाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे. आज एकूण 2,383 उमेदवारांचे राजकीय भवितव्य ठरणार आहे.

विदर्भातील 100 स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल

विदर्भात आज 76 नगरपरिषद आणि 24 नगरपंचायतींचे निकाल जाहीर होणार असून, संपूर्ण विभागाचे सत्ता चित्र आज स्पष्ट होणार आहे. अमरावती विभागातील नगरपरिषद निकालांकडे विशेष लक्ष लागले आहे.

अचलपूर, मूर्तिजापूर, नांदुरा आणि आर्वी नगरपरिषदांच्या निकालांची मोठी उत्सुकता असून, नागपूर विभागातील मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. आरमोरी, बुटीबोरी, कामठी, वर्धा नगरपरिषदांचे निकाल आज जाहीर होणार आहेत.

नागपूर जिल्ह्यावर विशेष लक्ष

नागपूर जिल्ह्यातील 27 नगरपरिषदांमध्ये आज 27 नगराध्यक्ष आणि 540 नगरसेवकांची निवड होणार आहे. जिल्ह्यातील 15 नगरपरिषद व 12 नगरपंचायतींचे निकाल आज जाहीर होतील.

कामठी नगरपरिषदेत नगराध्यक्षपदासाठी त्रिकोणी लढत होत असून, भाजपचे अजय अग्रवाल, काँग्रेसचे शकूर नागानी आणि बहुजन रिपब्लिकन मंचाचा उमेदवार रिंगणात आहेत. सावनेर नगरपरिषदेत भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत असून, संजना मंगळे विरुद्ध सीमा चाफेकर यांच्यात सामना रंगला आहे.

रामटेक नगरपरिषदेत भाजप, शिवसेना आणि काँग्रेसमध्ये बहुकोनी लढत आहे. काटोलमध्ये शेकाप विरुद्ध भाजप, कळमेश्वरमध्ये थेट लढत, तर उमरेडमध्ये शिंदे शिवसेना, काँग्रेस आणि भाजप अशी तिरंगी लढत होत आहे.

इतर जिल्ह्यांतील चुरशीच्या लढती

पुसद नगरपरिषदेत चौफेर, तर यवतमाळ नगरपरिषदेत पाच उमेदवार रिंगणात आहेत. भंडारा नगरपरिषदेत चार पक्षांमध्ये, गोंदियात चुरशीची, तर बुलढाण्यात बहुपक्षीय लढत होत असून आम आदमी पार्टीनेही मैदानात उडी घेतली आहे.

नागपूर विभागातील एकूण 55 नगरपरिषदांचे निकाल आज जाहीर होणार असून, चंद्रपूर जिल्ह्यात 11, वर्धा 6, भंडारा 4, गोंदिया 4 आणि गडचिरोली 3 नगरपरिषदांचा समावेश आहे.

अंतिम टप्पा, राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा दिवस

नगरपरिषद निवडणुकांचा आज अंतिम दिवस असून, विदर्भात ‘कोण धुरंधर’ हे आज ठरणार आहे. स्थानिक राजकारणातील सत्तासमीकरणे बदलणार की कायम राहणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button