वाशिम नगर परिषद निवडणूक : आज मतदान; शहराच्या राजकीय भवितव्याचा फैसला मतपेटीत

वाशिम, दि. — :
वाशिम नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू असून, शहराच्या राजकीय भवितव्याचा फैसला आज मतपेटीत बंद होणार आहे. नगराध्यक्ष पदासह ३२ नगरसेवकांच्या जागांसाठी सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी पाहायला मिळत आहे.
वाशिम नगर परिषद निवडणुकीसाठी आज एक नगराध्यक्ष व ३२ नगरसेवक पदांसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी एकूण ७५ हजार ७० मतदारांची नोंद असून, त्यामध्ये ३६ हजार ५४१ महिला आणि ३८ हजार ५२२ पुरुष मतदारांचा समावेश आहे.
नगराध्यक्ष पदासाठी ८ उमेदवार निवडणूक रिंगणात असून, तर १६ प्रभागांतील ३२ नगरसेवक पदांसाठी १७२ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. शहरातील १६ प्रभागांसाठी ३० शाळांमध्ये ८१ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरळीतपणे सुरू आहे.
मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, निवडणूक अधिकारी, कर्मचारी व पोलीस यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व मतदान केंद्रांवर विशेष दक्षता घेण्यात आली आहे.
लोकशाहीच्या या महत्त्वाच्या प्रक्रियेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
या निवडणुकीच्या निकालातून वाशिम नगर परिषदेवर कोणाचा झेंडा फडकणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.



