जलसंवर्धनाचे धडे प्रत्यक्ष अनुभवातून; पिंपळगाव बु. येथील विद्यार्थ्यांचा प्रेरणादायी उपक्रम

कारंजा लाड, दि. — :
विद्यार्थ्यांचे शिक्षण केवळ वर्गखोलीपुरते मर्यादित न ठेवता त्यांना समाज आणि निसर्गाशी जोडणारा प्रेरणादायी उपक्रम कारंजा लाड तालुक्यातील पिंपळगाव बु. येथे राबवण्यात आला. जिल्हा परिषद मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवातून जलसंवर्धनाचे महत्त्व जाणून घेतले.
जिल्हा परिषद मराठी शाळा, पिंपळगाव बु. येथील मुख्याध्यापक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी हा स्तुत्य व मार्गदर्शक सामाजिक उपक्रम आयोजित केला. या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांनी बेंबळा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्याची अभ्यासपूर्ण पाहणी केली. या ठिकाणी पाणी अडवणे, पाणी जिरवणे तसेच भूजल साठवण कशी होते, याची माहिती विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष दाखवून समजावून सांगण्यात आली.
शिक्षकांनी सोप्या व समजण्यासारख्या भाषेत जलसंवर्धनाचे महत्त्व स्पष्ट करत, भविष्यात निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईबाबत विद्यार्थ्यांना जागरूक केले. पाण्याचा योग्य वापर, निसर्गाचे संवर्धन आणि पर्यावरणाचे संरक्षण ही काळाची गरज असल्याचेही विद्यार्थ्यांना सांगण्यात आले.
वर्गाबाहेरील या शिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये निरीक्षणशक्ती, जिज्ञासा आणि सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण झाली आहे. निसर्ग, पर्यावरण आणि मानवी जीवन यांचा परस्परसंबंध विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून उमगला.
“आपणही समाजासाठी काहीतरी करू शकतो” ही सकारात्मक भावना रुजवणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आदर्श ठरत आहे.



