AmravatiEducation NewsLatest News

स्पर्धा परीक्षेच्या तयारीत अभ्यासक्रमावर लक्ष केंद्रीत करणे आवश्यक

सहायक जिल्हाधिकारी आकाश वर्मा यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

अमरावती, दि. 19 (जिमाका):
केंद्रीय व राज्य शासनाच्या सेवेत प्रवेशासाठी स्पर्धा परीक्षा हा प्रमुख मार्ग असून, प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा विविध टप्प्यांतून निवड प्रक्रिया पूर्ण होते. या परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी अभ्यासक्रमावर लक्ष केंद्रीत करून नियोजनबद्ध अभ्यास करणे अत्यावश्यक आहे, असा सल्ला वाशिम येथील सहायक जिल्हाधिकारी आकाश वर्मा यांनी दिला.

जिल्हा नियोजन सभागृहात आज स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात सहायक जिल्हाधिकारी आकाश वर्मा आणि उपजिल्हाधिकारी सुनील टाकळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी सहायक जिल्हाधिकारी कौशल्या एस., सहायक आयुक्त विकास खंदारे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ. सुरज मडावी, ग्रंथालय सहायक संचालक राजेश पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे आदी उपस्थित होते.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या २०२४ च्या परीक्षेत २० वा क्रमांक पटकाविलेल्या आकाश वर्मा यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, परीक्षा देण्यामागील उद्देश स्पष्ट असणे गरजेचे आहे. स्पर्धा परीक्षांमुळे देशपातळीवर तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरही सेवेस संधी मिळते. परीक्षेची तयारी करताना राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास, भूगोल आणि चालू घडामोडी या विषयांवर विशेष भर द्यावा. कठीण प्रश्नांमध्ये पर्यायांची अचूक पडताळणी केल्यास गुण वाढविण्यास मदत होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले की, वेळेचा योग्य उपयोग, नियमित चाचणी परीक्षा आणि निबंध लेखनाचा सराव केल्यास यश मिळविणे सोपे होते. मुलाखतीदरम्यान समस्यांवर नाविन्यपूर्ण उपाय सुचविण्याची तयारी असावी. स्पर्धा परीक्षांमध्ये यशासाठी सातत्य आणि संयम या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

उपजिल्हाधिकारी सुनील टाकळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, परीक्षेची तयारी करताना परीक्षेचा आकृतीबंध समजून घेणे, अभ्यासक्रम आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे. प्राथमिक आणि मुख्य परीक्षांमध्ये कमी कालावधी असल्याने दोन्ही परीक्षांचा समांतर अभ्यास फायदेशीर ठरतो. स्वतःच्या अभ्यासातून नोट्स तयार करणे, स्वयंशिस्त पाळणे आणि नियमित सराव करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी सहायक आयुक्त विकास खंदारे यांनी कार्यशाळेच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट करताना, स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी झालेल्या अधिकाऱ्यांकडून स्थानिक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावे, यासाठी हा उपक्रम राबविण्यात आल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारिका काळे यांनी केले, तर राजेश पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button