वडिलांनी किडनी देऊन वाचवले मुलीचे प्राण

सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल, अमरावती येथे 64वे यशस्वी किडनी प्रत्यारोपण
अमरावती, दि. ___ :
स्थानिक विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल), अमरावती येथे किडनी प्रत्यारोपणाची आणखी एक यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली असून, वडिलांनी आपली किडनी देऊन मुलीचे प्राण वाचविल्याची भावनिक घटना समोर आली आहे. रुग्णालयात आजपर्यंतची ही ६४ वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली.
या शस्त्रक्रियेमध्ये ३६ वर्षीय सोनल राजू चौधरी, रा. अमरावती, यांच्यावर यशस्वी किडनी प्रत्यारोपण करण्यात आले. सोनल या मागील काही वर्षांपासून किडनी आजाराने त्रस्त होत्या व नियमितपणे डायलिसिसवर होत्या. मात्र दीर्घकाळ डायलिसिस हा कायमस्वरूपी उपाय नसल्याने, डॉक्टरांनी किडनी प्रत्यारोपण हाच योग्य पर्याय असल्याची माहिती रुग्ण व कुटुंबीयांना दिली.
मुलीच्या पुढील आयुष्याचा विचार करून वडील सुरेश रंगराव गुहे (वय ६५ वर्षे) यांनी आपल्या एक किडनीचे दान करून मुलगी सोनलला नवीन जीवन देण्याचा धाडसी व प्रेरणादायी निर्णय घेतला. या शस्त्रक्रियेचा सर्व खर्च महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत पूर्णतः विनामूल्य करण्यात आला.
ही शस्त्रक्रिया वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे व विशेष कार्य अधिकारी डॉ. मंगेश मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. नेफ्रोलॉजिस्ट डॉ. हितेश गुल्हाने, युरो सर्जन डॉ. राहुल पोटोडे, डॉ. विक्रम देशमुख, डॉ. राहुल घुले, डॉ. प्रतिक चिरडे, डॉ. विशाल बाहेकर यांच्यासह बधिरिकरण तज्ज्ञ व वैद्यकीय पथकाने ही शस्त्रक्रिया यशस्वी केली.
यामध्ये डॉ. रोहित हातगावकर, डॉ. बाळकृष्ण बागवाले, डॉ. दिपाली देशमुख, डॉ. रमणिका ढोमणे, डॉ. विक्रांत कुळमेथे, डॉ. माधव ढोपरे, डॉ. जयश्री पुसदेकर आदी डॉक्टर, समाजसेवा अधीक्षक (वैद्यकीय) शितल बोंडे, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतील एमसीओ डॉ. पायल रोकडे, तसेच परिचारिका, आहारतज्ज्ञ, औषध विभाग व इतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.
सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल, अमरावती येथे किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी व विनामूल्य होत असल्याने केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर इतर राज्यांमधूनही रुग्ण उपचारासाठी येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे रुग्णालयाच्या वैद्यकीय सेवेबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे.



