Latest NewsLaturMaharashtraSocial News

लातूर जिल्ह्यात वेळा अमावस्येचा उत्साह शेतशिवारात काळ्या आईची पूजा; निसर्गाशी अतूट नात्याचे दर्शन

लातूर, दि. 19 :
लातूर जिल्ह्यात आज मार्गशीर्ष महिन्यातील वेळा अमावस्या पारंपरिक श्रद्धा आणि उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने संपूर्ण जिल्ह्यातील शेतशिवार माणसांनी फुलून गेले असून, शेतकरी आणि निसर्ग यांच्यातील अतूट नाते पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

या दिवशी शेतकरी, चाकरमानी, महिला तसेच लहान मुले कुटुंबासह शेतात दाखल होताना दिसून आली. काळ्या आईची म्हणजेच भूमीमातेची पूजा करण्यासाठी सकाळपासूनच शेतशिवारात गर्दी उसळली होती. वेळा अमावस्या हा पूर्णतः शेतीशी निगडित सण असून, रबी हंगामातील पिकांची भरघोस वाढ व्हावी, चांगले उत्पादन मिळावे आणि निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही पूजा केली जाते.

वेळा अमावस्येला दर्श अमावस्या किंवा येळ्ळी अमावस्या असेही संबोधले जाते. पेरणीनंतर येणारी सातवी अमावस्या असल्याने कन्नड भाषेतील ‘येळ्ळी’ या शब्दावरून हे नाव रूढ झाल्याचे सांगितले जाते. यावेळी शेतात कोप बांधून काळ्या आईची विधीवत पूजा करण्यात येते.

या सणात पांडव पूजेला विशेष महत्त्व असून, पूर्वजांचे स्मरण आणि त्यांना वंदन करण्याची परंपरा पाळली जाते. ग्रामदेवतेला अंबिलाचा नैवेद्य दाखवून तो शेतातील कोपीवर नेण्यात येतो. यानिमित्ताने ज्वारीची भाकरी, बाजरीचे उंडे, आंबट भात, गोड भात, खीर, अंबिल तसेच विविध भाज्यांची भज्जी असा पारंपरिक स्वयंपाक केला जातो.

शेती नसलेल्या नागरिकांनाही या दिवशी शेतात जेवणासाठी आमंत्रित केले जाते. सायंकाळी रबी पिकातून हेंडगा पेटवून शेतात फिरवण्याची परंपरा असून, त्यामुळे थंडी कमी होते, असा लोकसमज आहे. हिरवागार शेती, फुललेली पिके आणि निसर्गाच्या सान्निध्यात पार पडणारी ही पूजा म्हणजे शेतकरी आणि निसर्ग यांच्यातील अतूट नात्याचे सुंदर प्रतीक ठरत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button