राष्ट्रीय शालेय धनुर्विद्या स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर

अमरावतीत राज्यस्तरीय शालेय आर्चरी स्पर्धा उत्साहात सुरू
अमरावती, दि. 19 (जिमाका) :
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अमरावती व क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय शालेय आर्चरी (धनुर्विद्या) क्रीडा स्पर्धेतून झारखंड व मणिपूर येथे होणाऱ्या 69 व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा मुले व मुलींचा संघ जाहीर करण्यात आला आहे.
या स्पर्धा स्थानिक जिल्हा क्रीडा संकुलातील आंतरराष्ट्रीय आर्चरी रेंजवर 20 डिसेंबरपर्यंत सुरू असून, नुकताच त्यांचा औपचारिक उद्घाटन सोहळा पार पडला. इंडियन राऊंड या क्रीडा प्रकारात 17 व 19 वर्षांखालील गटातील चुरशीच्या लढतींमधून प्रथम चार क्रमांक मिळविणाऱ्या खेळाडूंची राष्ट्रीय स्तरावर निवड करण्यात आली.
17 वर्षांखालील गट
मुले :
ऋषिराज लायबर (अमरावती), संस्कार खिल्लारे (पुणे), ऋचीर चौधरी (पुणे), प्रतुष मोयर (अमरावती)
मुली :
जान्हवी पवार (पुणे), राशी गर्दे (कोल्हापूर), स्वरांजली बनसुडे (पुणे), श्रावणी पवार (अमरावती)
19 वर्षांखालील गट
मुले :
प्रथमेश पारते (पुणे), यश पाटील (कोल्हापूर), निखील कडवे (पुणे), स्मित जोरवलकर (नागपूर)
मुली :
तनुश्री सोनवणे (नाशिक), श्रेया केसकर (कोल्हापूर), केतकी सातपुते (नाशिक), आनंदी लायबर (अमरावती)
यशस्वी खेळाडूंना जिल्हा कोषागार अधिकारी श्रीमती शिल्पा पवार, जिल्हा नियोजन अधिकारी श्रीमती वर्षा भाकरे, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव व महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेचे सचिव प्रमोद चांदूरकर यांच्या हस्ते पदके व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी अनिल इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका क्रीडा अधिकारी राजू वढते, सलीम शेख तसेच विविध समित्यांमधील कर्मचारी परिश्रम घेत आहेत. स्पर्धांसाठी पोलीस प्रशासन, महानगरपालिका व आरोग्य विभागानेही मोलाचे सहकार्य केले आहे.
क्रीडा रसिकांनी या स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन क्रीडा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.



