BhandaraLatest NewsMaharashtra

भंडाऱ्यात ई-पॉस मशीनचा खोळंबा; गरिबांच्या राशनवर ‘डिजिटल’ कुऱ्हाड

२० वेळा अंगठा लावूनही धान्य मिळेना; कार्डधारक व दुकानदार हैराण

भंडारा, दि. — :
डिजिटल इंडिया आणि तंत्रज्ञानाच्या गप्पा सुरू असतानाच भंडारा जिल्ह्यात मात्र स्वस्त धान्य वितरण व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. ई-पॉस (e-PoS) मशीनमधील सततच्या तांत्रिक बिघाडामुळे गरिबांच्या हक्काच्या धान्यावरच संकट ओढावले आहे. अनेक राशन दुकानांवर कार्डधारकांना तासनतास रांगेत उभे राहूनही रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.

जिल्ह्यातील अनेक स्वस्त धान्य दुकानांवर बायोमेट्रिक अंगठा स्कॅन होत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या आहेत. नवीन ‘L-1’ स्कॅनर कुचकामी ठरत असल्याचा आरोप दुकानदार व ग्राहकांकडून करण्यात येत आहे. अनेक कार्डधारकांना १५ ते २० वेळा अंगठा लावूनही मशीन प्रतिसाद देत नाही, त्यामुळे दुकानांमध्ये वादाचे प्रसंगही घडत आहेत.

विशेषतः मजूर, वृद्ध नागरिक आणि महिलांची मोठी गैरसोय होत आहे. ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहे त्यांना ओटीपीच्या माध्यमातून काही प्रमाणात दिलासा मिळत असला, तरी ग्रामीण भागातील अनेक वृद्धांकडे मोबाईलच नसल्याने त्यांना धान्याविना परतावे लागत आहे. नेटवर्क समस्या, मशीन हँग होणे आणि सर्व्हर डाऊन या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत.

दरम्यान, या संपूर्ण प्रकाराचा फटका दुकानदारांनाही बसत आहे. स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून वायफाय बसवूनही मशीन नीट चालत नसल्याने दुकानदार हतबल झाले आहेत. प्रशासनाच्या तांत्रिक अडचणींचा राग ग्राहकांचा दुकानदारांवर निघत असून, तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.

या पार्श्वभूमीवर बायोमेट्रिक प्रणालीऐवजी पर्यायी व्यवस्था लागू करावी, नेटवर्क समस्यांवर तातडीने उपाययोजना कराव्यात आणि दोषी यंत्रणा दुरुस्त करावी, अशी जोरदार मागणी राशन दुकानदार संघटना आणि नागरिकांकडून होत आहे.

एकीकडे गरिबांच्या पोटासाठी असलेली सार्वजनिक वितरण व्यवस्था, तर दुसरीकडे प्रशासनाची अपयशी तांत्रिक यंत्रणा—या दोहोंच्या संघर्षात गरिबांचा घास हिरावला जात असल्याची तीव्र भावना भंडाऱ्यात व्यक्त होत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button