नागपूरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई

जबरी चोरी व दरोड्याच्या प्रयत्नातील पाहिजे आरोपीसह तिघे ताब्यात; तीन गुन्ह्यांचा उलगडा
नागपूर, दि. — :
नागपूर शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर आघात करत गुन्हे शाखा युनिट क्रमांक ३ च्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. जबरी चोरी आणि दरोड्याचा प्रयत्न प्रकरणातील पाहिजे आरोपीस त्याच्या दोन साथीदारांसह ताब्यात घेण्यात आले असून, या कारवाईत शहरातील तीन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
उघडकीस आलेले गुन्हे लकडगंज आणि जरीपटका पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दाखल आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींमध्ये शहबाज खान शेरखान, मजहर उर्फ मज्जू खान अफसर खान आणि शेख इर्शाद शेख सुभान यांचा समावेश आहे.
मुख्य आरोपी शहबाज खान याच्यावर नंदनवन पोलीस ठाण्यात यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून तो या प्रकरणात पाहिजे आरोपी होता.
कारवाईदरम्यान आरोपींकडून ईस्टमॅन कंपनीच्या चार बॅटऱ्या, कटिंग केलेल्या ई-रिक्षाचे साहित्य, कटर मशीन तसेच नंबर प्लेट असा सुमारे ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची वैद्यकीय तपासणी करून, पुढील तपास व कायदेशीर कारवाईसाठी मुद्देमालासह जरीपटका पोलीस ठाण्यात सुपूर्द करण्यात आले आहे. या कारवाईमुळे नागपूर शहरातील गुन्हेगारीवर मोठा आघात बसल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.



