राष्ट्रीय महामार्गावरील दिशादर्शक फलकांवर ‘गुरुकुंज मोझरी’ गायब; भाविकांची दिशाभूल, आंदोलनाचा इशारा

तिवसा | प्रतिनिधी : जयंत निखाडे
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या दुर्लक्षामुळे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची कर्मभूमी आणि जागतिक कीर्तीचे तीर्थक्षेत्र असलेल्या गुरुकुंज मोझरी गावाला जणू विसर पडल्याचे चित्र समोर आले आहे. राष्ट्रीय महामार्गावरील दिशादर्शक फलकांवर गुरुकुंज मोझरीचे नाव नसल्याने भाविक, पर्यटक आणि नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत असून, या गंभीर मुद्द्यावरून आता आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली गुरुकुंज मोझरी ही महाराष्ट्रासह देश-विदेशात श्रद्धास्थान म्हणून ओळखली जाते. येथे महाराजांची कर्मभूमी, महासमाधी आणि आश्रम असून, दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. जयंती आणि पुण्यतिथीच्या काळात लाखो भाविकांची उपस्थिती असते. मात्र, मोझरी गावाबाहेर बांधण्यात आलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या बायपासमुळे गावातून जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. याचा थेट फटका स्थानिक लघु व्यावसायिकांना बसत असून, भाविकांची संख्याही घटल्याचे दिसून येत आहे.
या परिस्थितीत भर म्हणजे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने बायपासच्या दोन्ही बाजूंना लावलेल्या दिशादर्शक फलकांवर मोठ्या शहरांची नावे नमूद केली असली, तरी गुरुकुंज मोझरीसारख्या प्रसिद्ध तीर्थक्षेत्राचा साधा उल्लेखही करण्यात आलेला नाही. परिणामी, बाहेरून येणारे भाविक व पर्यटक दिशाभूल होऊन थेट आठ किलोमीटर पुढे तिवसा येथे पोहोचत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. हा प्रकार प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे झाला की जाणीवपूर्वक, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
याशिवाय बायपास परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात जाणारे पारंपरिक रस्ते बंद झाले असून, अनेक ठिकाणी पाणी साचत आहे. पाण्याचा योग्य निचरा न झाल्यामुळे शेतात जाणे कठीण झाले असून, सापांसारख्या विषारी प्राण्यांचा धोका वाढला आहे. नाल्यांची योग्य व्यवस्था नसल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
या सर्व समस्यांबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला निवेदन देण्यात आले असून, तातडीने दिशादर्शक फलकांवर ‘गुरुकुंज मोझरी’चा उल्लेख करावा, शेतरस्ते पूर्ववत करावेत आणि पाण्याच्या नाल्यांची योग्य व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मागण्या मान्य न झाल्यास २४ डिसेंबर २०२५ रोजी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयासमोर डेरा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थ, भाविक आणि शेतकऱ्यांनी दिला आहे.



