BhandaraCrime NewsLatest NewsMaharashtra

लाखांदूरमध्ये भरधाव पिकअपची दुचाकीला धडक; सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचा मृत्यू

भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर शहरात भरधाव वाहनामुळे जीव गमावण्याची धक्कादायक घटना घडली आहे. अज्ञात पिकअप वाहनाने दिलेल्या भीषण धडकेत सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

लाखांदूर शहरातील शिवाजी टी पॉइंट परिसरात मंगळवारी रात्री हा अपघात घडला. महादेव केशव मेश्राम (वय ६२, रा. लाखांदूर) हे आपल्या दुचाकीने सायंकाळच्या सुमारास गावाकडे जात असताना चप्राड–लाखांदूर मार्गावरून येणाऱ्या भरधाव पिकअप वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

धडकेचा वेग इतका भीषण होता की महादेव मेश्राम हे थेट सिमेंट रस्त्यावर आदळले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. अपघातानंतर मदत न करता पिकअप चालकाने घटनास्थळावरून पळ काढल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेत मेश्राम यांना लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मेश्राम हे शिवाजी विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक होते. त्यांच्या निधनाची बातमी पसरताच रुग्णालय परिसरात शिक्षक, माजी विद्यार्थी व नागरिकांनी मोठी गर्दी केली.

या घटनेनंतर निष्काळजी व भरधाव वाहनचालकांविरोधात कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, लाखांदूर पोलिसांनी अज्ञात पिकअप वाहनाविरोधात गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे फरार चालकाचा शोध सुरू आहे. मात्र आरोपी अद्याप सापडलेला नसल्याने नागरिकांमध्ये रोषाचे वातावरण आहे

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button