मनपा निवडणुकीत AIMIM स्वबळावर मैदानात; आठ प्रभागांत उमेदवार देणार

अमरावती
आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय हालचालींना वेग आला असून, ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. AIMIM चे शहराध्यक्ष हाजीऱ खान यांनी ही माहिती दिली असून, येत्या मनपा निवडणुकीत पक्षाकडून आठ प्रभागांमध्ये उमेदवार उभे करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
हाजीऱ खान यांनी सांगितले की, AIMIM ही निवडणूक कोणत्याही पक्षाशी युती न करता स्वबळावर लढवणार आहे. मुस्लिमबहुल भागांसह इतर प्रभागांवरही लक्ष केंद्रित करण्यात येणार असून, सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न, विकासकामे आणि मूलभूत सुविधांचा मुद्दा निवडणुकीत केंद्रस्थानी असणार आहे. पक्षाकडे सध्या २८ भावी उमेदवार इच्छुक असून, त्यामधून योग्य उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.
यावेळी AIMIM कडून मनपा निवडणुकीत तब्बल २० नगरसेवक निवडून आणण्याचा दावा देखील करण्यात आला आहे. “समोर जो असेल त्याच्याशी लढाई करायला आम्ही सज्ज आहोत,” अशी आक्रमक भूमिका पक्ष नेतृत्वाकडून व्यक्त करण्यात आली. हाजी इरफान खान यांनीही या निर्णयाला दुजोरा देत पक्षाची संघटनात्मक तयारी पूर्ण असल्याचे सांगितले.
AIMIM च्या या घोषणेमुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून, शहरातील राजकारण अधिकच रंगतदार होणार आहे.



