नागपूर शहरात युनिट 3 पथकाची चोरी विरोधातील मोठी कारवाई; तीन गुन्हे उघडकीस

नागपूर : शहरात वाढत असलेल्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यात युनिट 3 पथकाला मोठे यश मिळाले आहे. गुरुवारी युनिट 3 पथकाने शटर फोडीचे दोन तर वाहन चोरीचा एक असा एकूण तीन गुन्हे उघडकीस आणले. या कारवाईत एका सराईत आरोपीसह एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले असून, एकूण 63 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
यामध्ये कोतवाली पोलीस ठाण्यातील शटर फोडीचा गुन्हा, गणेशपेठ पोलीस ठाण्यातील चोरीचा गुन्हा आणि लोहमार्ग नागपूर येथील वाहन चोरीचा गुन्हा समाविष्ट आहे. कोतवाली, गणेशपेठ आणि लोहमार्ग नागपूर येथे भा.न्या.स. अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या प्रकरणात आदिल उर्फ अद्दू इमरान खान (वय 19, रा. आजाद कॉलनी, बडा ताजबाग, पोलीस ठाणे सकरधरा, नागपूर) आणि एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडून 18,390 रुपये रोख, सुमारे 30 हजार रुपयांची डियो दुचाकी, तसेच 15 हजार रुपये किमतीचा विवो मोबाईल फोन असा एकूण 63,390 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ताब्यात घेतलेल्या आरोपी व विधी संघर्षग्रस्त बालकाची वैद्यकीय तपासणी करून मुद्देमालासह पोलीस ठाणे कोतवालीत हजर करण्यात आले असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.



