अहमदपूर ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीदरम्यान तरुण महिलेचा मृत्यू; नातेवाइकांचा उपचारातील हलगर्जीपणाचा आरोप

लातूर – लातूर जिल्ह्यातील अहमदपूर ग्रामीण रुग्णालयातून एक धक्कादायक घटना समोर आली असून, प्रसूतीसाठी दाखल झालेल्या तरुण विवाहित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. वेळेवर योग्य उपचार न मिळाल्याचा आरोप नातेवाइकांनी केल्याने आरोग्य यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
अहमदपूर तालुक्यातील धानोरा खुर्द येथील दीपाली दयानंद वाघमारे (वय २३) यांना सोमवार, १५ तारखेला प्रसूतीसाठी अहमदपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुरुवातीला प्रसूती सामान्य पद्धतीने होईल, असा अंदाज डॉक्टरांकडून व्यक्त करण्यात आला होता. मात्र अचानक दीपाली यांची प्रकृती खालावली आणि परिस्थिती गंभीर बनली.
नातेवाइकांच्या आरोपानुसार, रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांची वेळेवर मदत घेण्यात आली नाही तसेच आवश्यक उपचारात हलगर्जीपणा करण्यात आला. मंगळवारी, १६ तारखेला पुढील उपचारासाठी दीपाली यांना लातूर येथे हलवण्यात येत असताना कोळपा गावाजवळ रस्त्यातच त्यांची प्रकृती अधिक बिघडली आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. लातूर येथील डॉ. आदित्य कल्याणी यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
या घटनेनंतर नातेवाइकांनी अहमदपूर ग्रामीण रुग्णालयात तीव्र संताप व्यक्त केला असून दोषी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, अहमदपूर पोलीस ठाण्यात बुधवारी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक स्मिता जाधव पुढील तपास करीत आहेत.
प्रकरणाची गंभीर दखल घेत ‘जिल्हास्तरीय माता मृत्यू अन्वेषण समिती’मार्फत सखोल चौकशी करण्यात येणार आहे. समितीचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.



