अमरावती मनपा निवडणूक: रवी राणा यांच्या निवासस्थानी उमेदवारांची गर्दी; ४५० हून अधिक इच्छुकांची मागणी

अमरावती – महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमरावतीत राजकीय हालचालींना वेग आला आहे. गुरुवारी आमदार रवी राणा यांच्या निवासस्थानी भावी उमेदवारांसह नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. युवा स्वाभिमान पार्टीकडून उमेदवारीसाठी तब्बल ४५० हून अधिक इच्छुकांनी मागणी केल्याने शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
महानगरपालिका निवडणुका जवळ येत असताना युवा स्वाभिमान पार्टीमध्ये उमेदवारीसाठी चढाओढ सुरू झाल्याचे चित्र आहे. गुरुवारी अनेक भावी उमेदवारांनी थेट आमदार रवी राणा यांची भेट घेत आपली उमेदवारी मिळावी यासाठी मागणी केली. याचवेळी युवा नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या करण डेंडवाल यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी करत नागरिकांचीही मोठी गर्दी जमली होती.
या भेटीदरम्यान नागरिकांनी आपल्या प्रभागातील रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, वीज, स्वच्छता अशा विविध नागरी समस्यांबाबत तक्रारी मांडल्या. प्रलंबित प्रश्नांबाबत थेट आमदारांच्या निवासस्थानी धडक दिल्याने नागरिकांचा असंतोषही यावेळी स्पष्टपणे दिसून आला. आमदार रवी राणा यांनी नागरिकांचे प्रश्न ऐकून घेऊन योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याची माहिती आहे.
महानगरपालिका निवडणुकीपूर्वी युवा स्वाभिमान पार्टीमध्ये उमेदवारीसाठीची स्पर्धा अधिक तीव्र होत असून, कोणत्या उमेदवारांना संधी मिळते आणि मतदारांचा कौल कुणाच्या बाजूने झुकतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.



