सोयाबीन दरघसरणीचा वाशिम बाजार समितीवर परिणाम; शेतकऱ्यांची आवक घटली

वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या शेतकऱ्यांची गर्दी कमी झाल्याचे चित्र दिसून येत आहे. यामागील प्रमुख कारण म्हणजे सोयाबीनच्या दरात झालेली मोठी घसरण. एकेकाळी पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी एक असलेल्या वाशिम बाजार समितीवर या दरघसरणीचा थेट परिणाम होताना दिसत आहे.
दीड महिन्यांपूर्वी सोयाबीनला समाधानकारक दर मिळत असल्याने दररोज २५ ते ३० हजार क्विंटल सोयाबीनची आवक बाजार समितीत होत होती. मात्र सध्या बाजारात बिजवाई सोयाबीनचे दर ६ हजार रुपयांच्या आत गेल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी खुल्या बाजारात विक्री करण्यास टाळाटाळ सुरू केली आहे.
त्यातच नाफेडमार्फत हमीभावाने खरेदी सुरू झाल्याने अनेक शेतकरी थेट नाफेडकडेच सोयाबीन विकण्यास प्राधान्य देत आहेत. याचा परिणाम म्हणून गेल्या काही दिवसांपासून वाशिम बाजार समितीतील सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात घटली असून ती सध्या केवळ ६ हजार क्विंटलपर्यंत मर्यादित राहिली आहे.
सध्या साध्या सोयाबीनला ४ ते साडेचार हजार रुपये प्रतिक्विंटल इतकाच दर मिळत असल्याने, दरात सुधारणा होईपर्यंत शेतकरी प्रतीक्षेच्या भूमिकेत असल्याचे चित्र बाजार समितीत पाहायला मिळत आहे.
एकीकडे बाजारातील दरघसरण तर दुसरीकडे हमीभावाने खरेदी सुरू असल्याने या दोन्हींचा फटका वाशिम बाजार समितीच्या आवकेला बसत आहे. येत्या काळात सोयाबीनच्या दरात वाढ होणार की नाही, याकडे आता शेतकरी आणि व्यापारी वर्गाचे लक्ष लागले आहे.



