Crime NewsLatest NewsWashim

शेलुबाजार येथे तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला; एक गंभीर जखमी

वाशिम जिल्ह्यातील शेलुबाजार येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेलुबाजारमधील सोनल प्रकल्प कॉलनी परिसरात काही तरुणांनी एका तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची घटना काल रात्री घडली. या हल्ल्यात नुसरत अली रजाकत अली (वय 30, रा. मंगरूळपीर) हा तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर सध्या अकोला येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्राप्त माहितीनुसार, नुसरत अली हा शेलुबाजार परिसरात असताना काही अज्ञात तरुणांनी त्याच्यावर अचानक हल्ला चढवला. हल्लेखोरांनी नुसरत अली याच्यावर 12 ते 15 वेळा चाकूचे वार केल्याची प्राथमिक माहिती आहे. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेत गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या नुसरत अली याला उपचारासाठी अकोला शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

शांत आणि गुन्हेगारी घटनांपासून दूर असलेल्या शेलुबाजारमध्ये घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे. हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

या घटनेमुळे शेलुबाजार परिसरात खळबळ उडाली असून, लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button