Latest NewsMaharashtraWashim

वाशिममध्ये स्फोटक साहित्याचा मोठा साठा जप्त; चार आरोपी अटकेत

वाशिम जिल्ह्यातून एक गंभीर आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. स्फोटक साहित्याच्या प्रकरणात वाशिम पोलिसांनी मोठी कारवाई करत सुमारे एक लाख 77 हजार रुपयांचे डेटोनेटर जप्त केले आहेत. तीन महिन्यांपूर्वी चोरी गेलेला हा स्फोटक साठा शेतशिवारात लपवून ठेवण्यात आल्याची माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे. या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.

गुप्त माहितीच्या आधारे वाशिम स्थानिक गुन्हे शाखेने वाशिम तालुक्यातील सावरगाव जिरे शेतशिवारात छापा टाकला. या कारवाईदरम्यान शेतातील सोयाबीन कुटाराच्या गंजीमध्ये लपवून ठेवलेला स्फोटक साहित्याचा मोठा साठा पोलिसांच्या हाती लागला. विहीर फोडण्यासाठी वापरले जाणारे हे डेटोनेटर सात नायलॉनच्या गोण्यांमध्ये भरून ठेवण्यात आले होते.

पोलिसांनी घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात डेटोनेटर जप्त केले असून, ही कारवाई अत्यंत गोपनीयतेने पार पाडण्यात आली. या प्रकरणात चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून, स्फोटक साहित्य कुठून आणले गेले, तसेच ते कुठे आणि कशासाठी वापरण्याचा कट होता, याचा तपास सुरू आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास वाशिम ग्रामीण पोलीस करत आहेत. स्फोटक साहित्याचा संभाव्य गैरवापर टळल्याने मोठा अनर्थ टळल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button