Latest NewsMaharashtra

रावेर तालुक्यात सामान्य कार्यकर्त्याचा अमरण उपोषणाचा इशारा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट न्यायाची हाक

राज्यात सरकार ‘सर्वसामान्यांच्या न्यायासाठी कटिबद्ध’ असल्याचा दावा करत असताना, ग्रामीण भागात मात्र सामान्य नागरिकांना न्यायासाठी टोकाची भूमिका घ्यावी लागत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. रावेर तालुक्यातील वाघोड गावात एका सामाजिक कार्यकर्त्याने न्याय न मिळाल्याने थेट अमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला असून, त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच आर्त हाक दिली आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

रावेर तालुक्यातील वाघोड गावातील दुर्गा नगर परिसरात असलेल्या प्लॉट क्रमांक 527/अ, 527/ब आणि 490 या ठिकाणी कथित अतिक्रमण सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्लॉटच्या मालक वैशाली नितीन महाजन यांनी ग्रामपंचायतच्या सार्वजनिक गटारावर थेट पिलर उभारल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

या अतिक्रमणाला नागरिकांनी विरोध केला असता, संबंधित प्लॉटधारकांच्या पतीकडून महिलांना अश्लील शिवीगाळ करण्यात आल्याचा गंभीर आरोपही तक्रारीत नमूद करण्यात आला आहे.

तक्रारी असूनही कारवाई नाही

या प्रकरणी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयात लेखी तक्रारी अर्ज सादर केले असतानाही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे संतप्त झालेल्या वाघोड गावातील सामाजिक कार्यकर्ते गजानन प्रकाश तायडे यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केले आहे.

बुधवार हा उपोषणाचा तिसरा दिवस असून, उपोषणस्थळावरूनच गजानन तायडे यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना न्यायासाठी थेट साकडे घातले आहे.

ग्रामपंचायतीच्या भूमिकेवर सवाल

“वाघोड ग्रामपंचायत ठराविक लोकांनाच पाठीशी घालत आहे का? सामान्य नागरिकांवर मात्र तात्काळ कारवाई का केली जाते?” असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचा ठाम इशाराही गजानन तायडे यांनी दिला आहे.

इतकेच नव्हे, तर येत्या काही दिवसांत न्याय न मिळाल्यास थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन व उपोषण करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी सिटी न्यूज नेटवर्क शी बोलताना दिला आहे.

प्रशासनाची भूमिका काय?

एकीकडे अतिक्रमणाविरोधात कठोर कारवाईचे दावे केले जात असताना, दुसरीकडे सामान्य नागरिकाला न्यायासाठी उपोषण करावे लागत असल्याचे हे प्रकरण अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करत आहे. या प्रकरणात प्रशासन नेमकी काय भूमिका घेते, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची यावर दखल घेतली जाते का, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button