Amaravti GraminLatest Newsअमरावती महानगरपालिका चुनाव २०२५

महापालिका निवडणुकीसाठी ‘युवा स्वाभिमान’ सज्ज! ४३८ इच्छुकांची अर्जासाठी धाव; १८ डिसेंबरपासून मुलाखतींना प्रारंभ

अमरावती: अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे. आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वातील युवा स्वाभिमान पार्टीने निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी कंबर कसली असून, उमेदवारी अर्ज उचलण्याच्या प्रक्रियेला इच्छुकांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. शेवटच्या दिवसापर्यंत एकूण ४३८ उमेदवारांनी अर्जाची उचल केली असून, आता ही प्रक्रिया अधिकृतपणे थांबवण्यात आली आहे.

पुढील रणनीती: ३ दिवस चालणार मुलाखती
अर्ज घेण्याची मुदत संपल्यानंतर आता खऱ्या अर्थाने उमेदवारांच्या छाननीला सुरुवात होणार आहे. पक्षाने दिलेल्या माहितीनुसार, ज्या ४३८ इच्छुकांनी अर्ज नेले आहेत, त्यांच्या मुलाखती १८, १९ आणि २० डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आल्या आहेत. या मुलाखतींमधूनच प्रभागातील ताकद आणि जनसंपर्क बघून अंतिम उमेदवारांची घोषणा केली जाईल.

दिग्गज नेत्यांच्या निवड समितीसमोर होणार चाचणी
युवा स्वाभिमान पार्टीने उमेदवारांच्या निवडीसाठी एक तगडी ‘निवडणूक मुलाखत समिती’ गठीत केली आहे. यामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष निळकंठराव कात्रे यांच्यासह खालील मान्यवरांचा समावेश आहे:

मार्गदर्शक: सुनील राणा, प्रा.अजय गाडे, नंदेश अंबाडकर.

समिती सदस्य: शैलेंद्रजी कस्तुरे, जयंतराव वानखडे, हरिषजी चरपे, कमलकिशोरजी मालानी, शिवदासजी घुले, संजय हिंगासपुरे, सोनाली नवले, ज्योती सैरिसे, संजय मुनोत, मनोज चांदवानी, प्रा.सतीश खोडे, प्रा.संतोष बनसोड, गंगाधर आवारे, बाळु इंगोले आणि अवी काळे.

विकासाच्या मुद्द्यावर भर
“शहराचा सर्वांगीण विकास, सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न आणि सामान्य नागरिकांना मिळणाऱ्या मूलभूत सोयी-सुविधा हेच आमचे मुख्य निवडणुकीचे मुद्दे असतील,” असे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मोठ्या संख्येने आलेल्या अर्जांमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, महानगरपालिकेत परिवर्तनाचा निर्धार पक्षाने व्यक्त केला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button