महसूल मंत्र्यांच्या निर्णयाविरोधात अमरावतीत महसूल कर्मचाऱ्यांचा तीव्र निषेध

अमरावतीत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्णयाविरोधात महसूल अधिकारी व कर्मचारी आक्रमक झाल्याचे चित्र दिसून येत आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील तहसीलदारांच्या निलंबन प्रकरणाचा निषेध करत अमरावती जिल्ह्यातील महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून सामूहिक रजा घेत बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील गौण खनिज प्रकरणात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ४ तहसीलदार, ४ मंडळ अधिकारी आणि २ ग्राम महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन केल्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाविरोधात अमरावती जिल्ह्यातील महसूल विभागात तीव्र असंतोष पसरला आहे.
महसूल कर्मचारी संघटनांचा आरोप आहे की, संबंधित अधिकाऱ्यांची बाजू ऐकून न घेता तसेच कोणतीही चौकशी न करता थेट निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या निषेधार्थ अमरावती जिल्ह्यातील सर्व महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांना निवेदन देत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
या कारवाईमुळे तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, उपजिल्हाधिकारी यांच्यात तीव्र नाराजी असून महसूल विभागात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे कर्मचारी संघटनांचे म्हणणे आहे. निलंबित अधिकाऱ्यांवर करण्यात आलेली कारवाई तात्काळ रद्द करून त्यांना पूर्वपदावर पदस्थापना देण्यात यावी, अशी मागणी महसूल कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी महसूल मंत्र्यांकडे केली आहे.
दरम्यान, सोमवारपासून महसूल विभागाने बेमुदत काम बंद आंदोलन केल्यास सामान्य नागरिकांच्या महसूलविषयक कामकाजावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता या प्रकरणावर महसूल मंत्री काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



