नागपूरमध्ये दुकानफोडीचा प्रकार; श्रद्धा फरसान दुकानातून लाखोंचा मुद्देमाल लंपास

नागपूर शहरात चोरट्यांनी पुन्हा एकदा पोलिसांच्या सुरक्षेला आव्हान दिले आहे. कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील राम कुलर चौक परिसरात असलेल्या श्रद्धा फरसान या दुकानात अज्ञात आरोपीने घुसखोरी करत लाखोंचा मुद्देमाल लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, ही चोरी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. श्रद्धा फरसान हे दुकान रोहित कश्यप यांच्या मालकीचे असून, अज्ञात चोरट्याने दुकानाचे शटर उघडून आत प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील रोख रक्कम तसेच इतर मौल्यवान साहित्य चोरून नेल्याचे सांगण्यात येत आहे. चोरी गेलेल्या मुद्देमालाची नेमकी किंमत अद्याप स्पष्ट झालेली नाही, मात्र ती लाखोंच्या घरात असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
विशेष म्हणजे, ज्या परिसरात ही घटना घडली त्या ठिकाणचे स्ट्रीट लाईट बंद होते तसेच आजूबाजूचे सीसीटीव्ही कॅमेरेही कार्यरत नव्हते, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे परिसरातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मात्र, दुकानाच्या आत लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरीची संपूर्ण घटना कैद झाली असून, त्या फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे.
घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पंचनामा करून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नागपूर शहरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिक आणि व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण असून, या प्रकरणात पोलीस लवकरच आरोपीला अटक करतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



