दापुरी खुर्द गावात उच्च दाब विद्युत वाहिनीमुळे भीतीचे वातावरण

वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील दापुरी खुर्द गावात उच्च दाब विद्युत वाहिनी घरांच्या अगदी वरून जात असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या वीज वाहिनीमुळे कोणत्याही क्षणी मोठा अपघात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
दापुरी खुर्द गावातून जाणारी ही उच्च दाबाची विद्युत वाहिनी थेट वस्तीच्या भागातून गेल्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. जोरदार वारा सुटल्यास वीजेच्या तारा एकमेकांना घासून वारंवार शॉर्ट सर्किट होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यामुळे अनेकदा ठिणग्या उडण्याचे प्रकार घडले असून, मोठ्या दुर्घटनेची भीती कायम आहे.
गावातील अनेक घरांची छपरे टिनपत्र्याची असून, तार तुटून घरांवर पडल्यास गंभीर अपघात होऊ शकतो. गावात लहान मुले, महिला आणि वृद्ध नागरिकांची संख्या मोठी असल्याने संभाव्य जीवितहानीचा धोका अधिक आहे. यापूर्वीही काही घटनांमध्ये ठिणग्या उडाल्या असल्या तरी सुदैवाने आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मात्र, भविष्यातील अनर्थ टाळण्यासाठी महावितरण विभागाने तात्काळ दखल घेऊन ही उच्च दाब विद्युत वाहिनी स्थलांतरित करावी, अशी ठाम मागणी ग्रामस्थांनी केली आहे. जोपर्यंत योग्य उपाययोजना केल्या जात नाहीत, तोपर्यंत गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण कायम असल्याचे चित्र आहे.
दापुरी खुर्द ग्रामस्थांच्या या मागणीची महावितरणकडून दखल घेतली जाते का, आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जातात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.



