अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ संदर्भात प्रशासनाची पत्रकार परिषद

अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ संदर्भात आज एक महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद पार पडली. ही पत्रकार परिषद अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी निवडणूक प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, दिनांक १ जुलै २०२५ रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदार यादीनुसार अमरावती महानगरपालिकेच्या २२ प्रभागांसाठी प्रारूप मतदार यादी तयार करण्यात आली होती. ही प्रारूप मतदार यादी २० नोव्हेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर २० नोव्हेंबर ते ३ डिसेंबर २०२५ या कालावधीत नागरिकांकडून हरकती व सूचना मागविण्यात आल्या.
प्राप्त हरकती व सूचनांवर निर्णय घेऊन प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी १५ डिसेंबर २०२५ रोजी प्रमाणित करण्यात आली आहे. ही अंतिम मतदार यादी महानगरपालिकेच्या सर्व झोन कार्यालयांमध्ये तसेच अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने १५ डिसेंबर २०२५ रोजी अमरावती महानगरपालिका निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीसाठी एकूण ७ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांची कार्यालये विविध झोन व प्रभागांमध्ये कार्यरत असतील.
अंतिम मतदार यादीनुसार अमरावती महानगरपालिकेत एकूण ६ लाख ७७ हजार १८० मतदार असून, यामध्ये ३ लाख ३७ हजार ९३५ महिला, ३ लाख ३९ हजार १७७ पुरुष आणि ६८ इतर मतदारांचा समावेश आहे. मतदारांना आपले नाव मतदार यादीत तपासण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने mahasecvoterlist.in हे संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहे.
महानगरपालिका निवडणूक १५ जानेवारी २०२६ रोजी होणार असून, मतमोजणी १६ जानेवारी २०२६ रोजी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, नवसारी, अमरावती येथे पार पडणार आहे.
या पत्रकार परिषदेला अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त योगेश पिठे, जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर, सहाय्यक निवडणूक अधिकारी अक्षय निलंगे यांच्यासह मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते.
प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी आपले नाव मतदार यादीत तपासून लोकशाहीच्या या महत्त्वाच्या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा.



