Latest NewsMaharashtra

लोणार सरोवरातील पाण्याची पातळी धोकादायकरीत्या वाढली; ऐतिहासिक मंदिरे जलमग्न, जैवविविधतेला धोका

लोणार | प्रतिनिधी – गजानन राऊत

जगप्रसिद्ध आणि शास्त्रीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे असलेले लोणारचे खाऱ्या पाण्याचे सरोवर पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून सरोवरातील पाण्याची पातळी सातत्याने वाढत असून, यामुळे सरोवर परिसरातील ऐतिहासिक मंदिरे पाण्याखाली जात आहेत. यासोबतच सरोवरातील जैवविविधतेलाही गंभीर धोका निर्माण झाला आहे.

वाढत्या पाण्यामुळे सरोवर परिसरातील अनेक पुरातन व हेमाडपंथी मंदिरे पूर्णतः जलमग्न झाली आहेत. विशेष म्हणजे भाविकांचे श्रद्धास्थान असलेले कमळजा देवीचे मंदिर, जे आजवर कधीही पाण्याखाली गेले नव्हते, ते यावेळी तब्बल १५ फूट पाण्याखाली गेले आहे. या घटनेमुळे भाविकांमध्ये तसेच अभ्यासकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

सुमारे ५२ हजार वर्षांपूर्वी उल्कापातामुळे निर्माण झालेले लोणार सरोवर खाऱ्या पाण्यासाठी जगप्रसिद्ध आहे. मात्र, अलीकडच्या काळात सरोवरात मासे आढळून आल्याने शास्त्रज्ञ आणि संशोधकांमध्ये आधीच चर्चा सुरू होती. आता पाण्याची पातळी अनाकलनीयरीत्या वाढत असल्याने या नैसर्गिक आश्चर्याबाबत पुन्हा अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

सरोवरातील पाणी नेमके कुठून येत आहे, भूगर्भातून नव्या जलस्त्रोतांचा उद्रेक होत आहे का, की हवामान बदलाचा हा परिणाम आहे, याबाबत अद्याप कोणताही ठोस निष्कर्ष समोर आलेला नाही. या बदलांमुळे सरोवराच्या नैसर्गिक रचनेवर आणि पर्यावरणीय संतुलनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरवर्षी देश-विदेशातून पर्यटक, भूगर्भशास्त्रज्ञ आणि संशोधक लोणार सरोवराचा अभ्यास करण्यासाठी येथे येतात. मात्र, इतक्या गंभीर बदलांनंतरही अद्याप सखोल आणि शास्त्रीय संशोधन होत नसल्याने पुरातत्त्व विभाग व संबंधित शासकीय यंत्रणांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

सरोवरातील वाढती पाण्याची पातळी आणि बदलती जैवविविधता ही केवळ लोणारपुरती मर्यादित समस्या नसून, ती पर्यावरणीयदृष्ट्या गंभीर इशारा असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. त्यामुळे या बदलांची कारणे शोधण्यासाठी तातडीने शास्त्रीय अभ्यास व ठोस उपाययोजना राबवण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button