Crime NewsLatest NewsWashim

लग्नाच्या नावाखाली फसवणूक, अपहरण व दरोड्याचा पर्दाफाश; रिसोड पोलिसांची मोठी कारवाई

रिसोड

वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात लग्नाच्या नावाखाली फसवणूक करून अपहरण आणि दरोड्याचा अत्यंत गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी रिसोड पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत मोठे रॅकेट उघड केले असून, पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील आणखी आठ आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

पोलिस तपासानुसार, १० डिसेंबर २०२५ रोजी वाशिम जिल्ह्यातील आसेगाव पेन येथील दीपक सिताराम खानझोडे यांचा विवाह संभाजीनगर येथील राधा तुपे हिच्याशी लावून देण्यात आला होता. या विवाहासाठी मध्यस्थामार्फत दोन लाख रुपयांचा आर्थिक व्यवहार झाल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

विवाहानंतर नवरी पळून जाण्याच्या तयारीत असल्याचा संशय कुटुंबीयांना आल्याने ते सतर्क झाले होते. दरम्यान, १३ डिसेंबर रोजी नवरीकडील १० ते १२ जण चारचाकी वाहनातून आसेगाव पेन येथे दाखल झाले. नवरी घरात नसल्याचे लक्षात येताच आरोपींनी घरात घुसून तोडफोड केली आणि नवरदेवाचे वडील सिताराम खानझोडे यांचे अपहरण केले.

यानंतर आरोपी नवरदेवाच्या मामाच्या घरी मोहजा येथे गेले. तेथेही घरात घुसून मोठ्या प्रमाणावर नासधूस करण्यात आली. अपहरण केलेल्या व्यक्तीला घेऊन आरोपी जालन्याकडे जात असताना लोणी गावाजवळ एका चारचाकी वाहनाला अडवून त्याची तोडफोड करण्यात आली. तसेच वाहनातील चार जणांना जबर मारहाण करून त्यांच्या जवळील १५ हजार रुपये हिसकावून नेण्यात आले.

या घटनांची गंभीरता लक्षात घेत रिसोड पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने अहिल्यानगर, संभाजीनगर आणि जालना येथे एकाचवेळी छापे टाकले. या कारवाईत अहिल्यानगर येथून अपहरण करण्यात आलेल्या सिताराम खानझोडे यांची सुखरूप सुटका करण्यात पोलिसांना यश आले.

या प्रकरणात राहुल दिलीप म्हस्के (वय ३२, रा. नागेवाडी, जि. जालना), सतीश विनायक जाधव (वय २९, रा. जालना), आकाश छगन गायकवाड (रा. जालना) यांना अटक करण्यात आली आहे. तसेच नवरी मुलगी आणि एजंट शांताराम कडुजी खराटे (रा. मोहजा रोड) यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सर्व आरोपींविरोधात फसवणूक, अपहरण आणि दरोड्याचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून, उर्वरित फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button