Latest NewsMaharashtraSocial News

रावेर तालुक्यातील वाघोड गावात अमरण उपोषण; ग्रामपंचायतीच्या मालमत्तेवरील अतिक्रमणाचा आरोप

रावेर

रावेर तालुक्यातील वाघोड गावात ग्रामपंचायत कार्यालयासमोर सुरू असलेल्या अमरण उपोषणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ग्रामपंचायतीच्या मालमत्तेचे नुकसान तसेच सार्वजनिक गटारीवर अतिक्रमण करून घराचे पिलर उभारल्याचा गंभीर आरोप करत गावातील एका युवकाने कालपासून अमरण उपोषण सुरू केले आहे.

वाघोड गावातील युवक गजानन प्रकाश तायडे यांनी हे उपोषण सुरू केले असून, दुर्गा नगर परिसरातील प्लॉट क्रमांक 527/अ, 527/ब आणि 49 चे प्लॉटधारक वैशाली नितीन महाजन यांनी ग्रामपंचायतीच्या मालमत्तेवर अतिक्रमण केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

गजानन तायडे यांचा आरोप आहे की, ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक गटारीवर अतिक्रमण करून नवीन घराचे पिलर उभारण्यात आले आहेत. यामुळे गटारीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, येत्या पावसाळ्यात गावातील नागरिकांना पाणी साचणे व सांडपाण्याच्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

या प्रकरणी तायडे यांनी ग्रामपंचायत तसेच संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी लेखी तक्रारी व अर्ज सादर केले आहेत. मात्र, वारंवार पाठपुरावा करूनही ग्रामपंचायतीकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

“ग्रामपंचायतीच्या प्लॉटवर आणि गटारीवर अतिक्रमण होत असताना प्रशासन गप्प का आहे?” असा थेट सवाल उपोषणकर्त्यांनी उपस्थित केला आहे. संबंधित प्लॉटधारकांवर गुन्हा दाखल करावा तसेच तात्काळ अतिक्रमण हटवावे, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, आज सकाळी ग्रामपंचायत सरपंच संजय मसाने तसेच ग्रामपंचायत सदस्यांनी उपोषणस्थळी भेट देत गजानन तायडे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, “जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही,” अशी ठाम भूमिका गजानन तायडे यांनी घेतली आहे.

या अमरण उपोषणामुळे वाघोड गावात चर्चेला उधाण आले असून, प्रशासन या प्रकरणी पुढे काय निर्णय घेते, याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button