यवतमाळ नगरपरिषद निवडणुकीत भाजपचा सेलिब्रिटी तडका; महाबली खलींचा भव्य रोड शो

यवतमाळ
यवतमाळ नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचाराला वेगळाच रंग चढला असून, भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रियदर्शनी अशोक उईके यांच्या प्रचारासाठी थेट आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कुस्तीपटू महाबली खली यवतमाळमध्ये दाखल झाले. त्यांच्या उपस्थितीत शहरात भव्य रोड शोचे आयोजन करण्यात आले.
या रोड शोदरम्यान महाबली खली यांना पाहण्यासाठी यवतमाळ शहरातील विविध भागांत नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती. रस्त्यांच्या दुतर्फा उभे राहून नागरिक, युवक व चाहत्यांनी टाळ्या व घोषणाबाजी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अनेक ठिकाणी नागरिकांनी महाबली खली यांच्यासोबत फोटो व व्हिडीओ काढण्यासाठीही मोठी गर्दी केली.
महाबली खली यांच्या उपस्थितीमुळे भाजपच्या प्रचाराला मोठी प्रसिद्धी मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले. रोड शोदरम्यान संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी व समर्थक मोठ्या संख्येने या रोड शोमध्ये सहभागी झाले होते.
प्रियदर्शनी अशोक उईके यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेला हा रोड शो शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आला. दिवसभर यवतमाळ शहरात निवडणूक प्रचारासोबतच महाबली खली यांची उपस्थिती हा चर्चेचा प्रमुख विषय ठरला.
एकीकडे निवडणूक प्रचार दिवसेंदिवस रंगतदार होत असताना, अशा सेलिब्रिटी रोड शोमुळे मतदारांमध्ये उत्सुकता वाढल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.



