Latest NewsMaharashtra Politicsmelghat

मेळघाटातील आदिवासी बांधवांची ‘संसदवारी’; दुर्गम भागातून थेट लोकशाहीच्या केंद्रापर्यंत ऐतिहासिक प्रवास

अमरावती

मेळघाटातील दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. आयुष्यात कधी आपल्या गावाची वेसही न ओलांडलेल्या नागरिकांनी थेट देशाची राजधानी नवी दिल्ली गाठत लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिराला — संसद भवनाला भेट दिली. अमरावतीचे खासदार बळवंतराव वानखडे यांच्या पुढाकारातून आणि माजी मंत्री ॲड. यशोमतीताई ठाकूर यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या ‘संसदवारी’ उपक्रमाने सर्वत्र कौतुक मिळवले आहे.

अमरावती जिल्ह्यातील मेळघाट हा निसर्गसंपन्न असला, तरी आजही अतिशय दुर्गम व वंचित भाग म्हणून ओळखला जातो. अनेक आदिवासी बांधव आयुष्यभर आपल्या गावाबाहेर न पडताच जीवन व्यतीत करतात. अशा परिस्थितीत या समाजाला देशाच्या लोकशाही प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, या उद्देशाने खासदार बळवंतराव वानखडे यांनी हा अभिनव उपक्रम हाती घेतला.

या उपक्रमांतर्गत मेळघाटातील प्रत्येक गावातून प्रतिनिधींची निवड करून त्यांना थेट नवी दिल्ली येथे नेण्यात आले. हा दौरा केवळ सहल नसून, दुर्गम भागातील जनतेला लोकशाहीच्या मुख्य प्रवाहाशी जोडणारा एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.

या दौऱ्यात आदिवासी बांधवांनी संसद भवन पाहिले, देशाचा कारभार कसा चालतो याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू दिसून आले. “आम्हीही या देशाच्या लोकशाहीचा अविभाज्य भाग आहोत,” ही भावना या दौऱ्यामुळे अधिक दृढ झाल्याचे सहभागी आदिवासींनी सांगितले.

या दिल्ली दौऱ्याचे विशेष आकर्षण म्हणजे काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस व खासदार प्रियंका गांधी तसेच संघटन सरचिटणीस खासदार के. सी. वेणुगोपाल यांच्याशी झालेला थेट संवाद. खासदार वानखडे यांच्या पुढाकारातून आदिवासी बांधवांना या वरिष्ठ नेत्यांशी अनौपचारिक संवाद साधण्याची संधी मिळाली. यावेळी आदिवासी समाजाच्या समस्या, अपेक्षा आणि भावना थेट मांडण्यात आल्या. अनेकांसाठी हा अनुभव आयुष्यातील पहिलाच होता.

हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी माजी पालकमंत्री व आमदार ॲड. यशोमतीताई ठाकूर, काँग्रेस अमरावती ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबलूभाऊ देशमुख, तसेच चिखलदरा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

या ऐतिहासिक संसद दर्शन दौऱ्यात माजी जि.प. सभापती दयारामजी काळे, तालुकाध्यक्ष सहदेव बेलकर, राहुल येवले, मेहपतसिंग उईके, संजयभाऊ बेलकर, राजेशभाऊ सेमलकर, युवक काँग्रेस अध्यक्ष पियुष मालवीय यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दुर्गम मेळघाट आणि देशाच्या लोकशाही व्यवस्थेमध्ये उभा राहिलेला हा सामाजिक पूल भविष्यात आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button