प्रधानमंत्री आवास योजनेत गैरव्यवहाराचा आरोप देवणीतील नागतीर्थवाडी ग्रामस्थांचे जि.प. कार्यालयासमोर आमरण उपोषण

लातूर, दि. 15 : लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील नागतीर्थवाडी ग्रामपंचायतीत सरपंच आणि ग्रामसेवकाच्या कथित गैरकारभाराचा प्रकार उघडकीस आला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेली घरकुले परस्पर रद्द करून गरजू लाभार्थ्यांना वंचित ठेवण्यात आल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या विरोधात ग्रामस्थांनी लातूर जिल्हा परिषद कार्यालयासमोर कालपासून आमरण उपोषण सुरू केले आहे.
उपोषणकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, नागतीर्थवाडी ग्रामपंचायतीतील सरपंच आणि ग्रामसेवक यांनी संगनमत करून ‘ड’ यादीत मंजूर असलेली घरकुले कोणतीही पूर्वसूचना किंवा अर्ज न घेता रद्द केली. त्यामुळे अनेक पात्र लाभार्थी प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभापासून वंचित राहिले आहेत.
या आमरण उपोषणात वनबाई गुणाले, हनुमंत विठ्ठल कासले आणि तात्याराव बाबुराव गुणाले सहभागी आहेत. उपोषणकर्त्या वनबाई गुणाले यांनी आपले घरकुल कोणताही अर्ज न करता रद्द करण्यात आल्याचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे, त्यांना बीपी व शुगरचा आजार असतानाही गावाला न्याय मिळावा, यासाठी त्या उपोषणात सहभागी झाल्या आहेत.
ग्रामस्थांनी सरपंच आणि ग्रामसेवकांवर तात्काळ कारवाई करून निलंबनाची मागणी केली आहे. तसेच, सरपंचपदाचा गैरवापर सरपंचाचे पती करत असल्याचा आणि निर्णय प्रक्रियेत हस्तक्षेप होत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणात पैसे घेऊन दुसऱ्यांच्या नावावर घरकुले मंजूर करण्यात आल्याचा तसेच ग्रामसेवकाने स्वतःच्या मोबाईलवर पैसे स्वीकारल्याचा गंभीर आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. शासनाने ‘सरसकट घरकुल’ देण्याचे निर्देश दिले असतानाही मंजूर घरकुले रद्द करण्यात आल्याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
ग्रामस्थांची मागणी आहे की, रद्द करण्यात आलेली सर्व मंजूर घरकुले तात्काळ पूर्ववत करण्यात यावीत आणि दोषींवर कठोर कारवाई करून त्यांना न्याय द्यावा.



