कोरटा येथे बिरसा मुंडा जयंती व तंट्या भिल्ल पुण्यस्मरणानिमित्त भव्य सांस्कृतिक महोत्सव

उमरखेड
यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील कोरटा येथे आद्य क्रांतिकारक क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त तसेच महान क्रांतिकारक तंट्या भिल्ल यांच्या १३६ व्या पुण्यस्मरणानिमित्त भव्य सांस्कृतिक महोत्सव व सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. आदिवासी संस्कृती, इतिहास व अस्मितेचा जागर करणारा हा कार्यक्रम उपस्थितांच्या मनावर ठसा उमटवणारा ठरला.
कोरटा येथील सांस्कृतिक भवनात आयोजित या कार्यक्रमात विश्वनाथ दंडार मंडळ, कोरटा (प्रमुख – संभाजी पोटे) तसेच भिमदेव नायकडा आदिवासी नृत्य पथक, कोरटा (प्रमुख – अरुण तिळेवाड) यांनी सादर केलेल्या पारंपरिक आदिवासी नृत्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांच्या तालावर सादर झालेल्या नृत्यांनी संपूर्ण कार्यक्रमाला विशेष रंगत आणली.
या दोन्ही नृत्य पथकांचा कै. उकंडराव खरवडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांचे नातू श्रीकांत खरवडे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या सन्मान सोहळ्यामुळे कलाकारांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. डॉ. आरती फुपाटे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा, यवतमाळ या होत्या. कार्यक्रमाचे उद्घाटक नागोराव शिर्डे महाराज यांनी आपल्या मनोगतातून भगवान बिरसा मुंडा व तंट्या भिल्ल यांच्या क्रांतिकारी विचारांचे तसेच स्वातंत्र्यलढ्यातील आदिवासी समाजाच्या योगदानाचे सविस्तर विवेचन केले.
यावेळी हनवतराव इंगळे, शंकर आगलावे, संतोष खुपसे सर, पवने पो. पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काशिनाथ खरवडे सर यांनी केले, तर प्रस्ताविक संतोष खुपसे सर यांनी मांडले.
कार्यक्रमाची सांगता अरुण तिळेवाड, श्रीकांत खरवडे, अस्मिता खरवडे व छकुली गायकवाड यांनी केलेल्या आभार प्रदर्शनाने करण्यात आली. कार्यक्रमानंतर पल्लवी मेंडके, वंदेश पिलवंड व अमोल सिदणवाड यांनी प्रतिक्रिया देत अशा उपक्रमांमुळे आदिवासी संस्कृती, इतिहास व अस्मिता नव्या पिढीपर्यंत पोहोचत असल्याचे मत व्यक्त केले.
या भव्य सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा परिषद शाळा, आश्रम शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय तसेच समस्त गावकरी मंडळी, कोरटा यांचे मोलाचे सहकार्य लाभले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन श्रीकांत जांबुवंतराव खरवडे यांनी केले असून, त्यांनी आपल्या आजोबा कै. उकंडराव खरवडे गुरुजी यांच्या सामाजिक कार्याची परंपरा पुढे नेल्याचे गौरवोद्गार मान्यवरांनी काढले.



