AmravatiCrime NewsLatest News

अमरावतीत गुन्हे शाखेची मोठी कारवाई; तहसील कार्यालयातून चोरीला गेलेला १८ लाखांचा रेतीवाहू डम्पर जप्त

अमरावती

अमरावती शहरात अवैध रेती वाहतूक व वाहन चोरीच्या गुन्ह्यांवर गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत तहसील कार्यालयातूनच चोरीला गेलेला तब्बल १८ लाख रुपये किमतीचा रेतीवाहू डम्पर शोधून काढला आहे. या प्रकरणात आरोपी चालकाला ताब्यात घेण्यात आले असून ही कारवाई गाडगे नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल गुन्ह्यात करण्यात आली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ११ डिसेंबर २०२५ रोजी अमरावती तहसील कार्यालयात अवैध विना रॉयल्टी रेती वाहतुकीप्रकरणी ट्रक क्रमांक MH-40-Y-3193 जप्त करून प्रशासकीय कारवाईसाठी पार्क करण्यात आला होता. मात्र, ट्रक मालक गजानन काळपांडे याने तहसील कार्यालयाच्या पार्किंगमधून सदर ट्रक चोरून नेल्याची तक्रार महसूल अधिकारी टिना विलास चव्हाण यांनी दिली होती.

या तक्रारीवरून गाडगे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 1047/2025, कलम 303 भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा, अमरावती शहर यांनी सुरू केला. तपासादरम्यान गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, चोरीस गेलेला ट्रक नांदगाव पेठ हद्दीतील रिवा हॉटेलजवळील युनिवर्सल मोटर्स येथे उभा आहे.

माहितीची खातरजमा करताच गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तेथे सदर ट्रक मिळून आला. तपासात हा ट्रक चालक सुनिल लक्ष्मणराव भांबुरकर (रा. वलगाव) याने आणल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतल्यानंतर चौकशीत त्याने ट्रक मालक गजानन काळपांडे यांच्या सांगण्यावरूनच तहसील कार्यालयातून ट्रक काढून आणल्याची कबुली दिली.

गुन्हे शाखेने तब्बल १८ लाख रुपये किमतीचा डम्पर जप्त करत आरोपी चालकाला पुढील कारवाईसाठी गाडगे नगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपींचा तपास पुढे सुरू आहे.

ही यशस्वी कारवाई
पोलीस आयुक्त अरविंद चावरीया,
पोलीस उपआयुक्त गणेश शिंदे, रमेश धुमाळ, श्याम घुगे,
सहायक पोलीस आयुक्त शिवाजी बचाटे,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण
यांच्या मार्गदर्शनाखाली
सहायक पोलीस निरीक्षक मनीष वाकोडे, पोलीस हवालदार सतीश देशमुख, फिरोज खान, मंगेश लोखंडे, प्रशांत मोहोड, पोलीस नाईक नाझीमोद्दीन सैय्यद, रणजित गावंडे तसेच चालक अमलदार प्रभात पोकडे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

अवैध रेती वाहतूक आणि शासकीय कारवाईतील वाहन चोरीसारख्या गंभीर गुन्ह्यांवर अमरावती गुन्हे शाखेने वेळीच कारवाई करत मोठा मुद्देमाल हस्तगत केला असून, या कारवाईमुळे रेती माफियांना चाप बसणार असल्याचे बोलले जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button