श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ महोत्सवाला भव्य प्रारंभ; शहरात निघाली कलश यात्रा

कल्पना सहायता फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ महोत्सवाला आज भव्य आणि भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. या महोत्सवाच्या प्रारंभी शहरातून भव्य कलश यात्रा काढण्यात आली असून, या यात्रेमुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
कल्पना सहायता फाउंडेशनच्या वतीने १५ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधीत सात दिवसीय श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक महोत्सवाची सुरुवात सोमवारी सकाळी माहेश्वरी भवन, साकरा येथील राधाकृष्ण मंदिरातून विधीवत पूजा-अर्चना करून करण्यात आली. त्यानंतर भव्य कलश यात्रेला प्रारंभ झाला.
डोक्यावर कलश धारण केलेल्या महिला, भगव्या ध्वजांसह सहभागी झालेले भाविक, भजन-कीर्तन, हरिनामाचा जयघोष यामुळे शहरातील वातावरण पूर्णपणे भक्तिमय झाले होते. ही कलश यात्रा शहरातील विविध प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत पुन्हा सभास्थळी पोहोचली.
या पवित्र कलश यात्रेसाठी परमपूज्य १००८ डॉ. श्री शक्ती पीठाधीश्वर श्री शक्तीची महाराज, अवंतिका श्री रामानुज कोट पीठाधीश्वर, उज्जैन (मध्य प्रदेश) येथील श्री स्वामी रंगनाथाचार्यजी महाराज, तसेच कथा व्यास श्री स्वामी डॉ. माधव प्रपन्नाचार्यजी (श्री युवराज स्वामी) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी शहरातील अनेक गणमान्य नागरिक, सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या संपूर्ण आयोजनासाठी पुरुषोत्तम राम विलास शर्मा, जय अंबे ग्रुप, विजय उर्फ विकी शर्मा, त्यांचा समस्त मित्रपरिवार तसेच कल्पना सहायता फाउंडेशन यांनी विशेष सहकार्य केले आहे. आगामी सात दिवसांमध्ये श्रीमद् भागवत कथेद्वारे भक्तांना अध्यात्मिक ज्ञानाचा लाभ मिळणार असून, भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.



