पक्षविरोधी कारवाई : संतोष ढवळे यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून हकालपट्टी

यवतमाळ नगर परिषदेच्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान पक्षाच्या अधिकृत भूमिकेच्या विरोधात जाऊन काँग्रेस पक्षाचा प्रचार केल्याप्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने ज्येष्ठ नेते व यवतमाळ विधानसभा प्रमुख संतोष ढवळे यांच्यावर कठोर कारवाई करत त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या तसेच इतर नगरसेवक पदांच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात जाऊन संतोष ढवळे यांनी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार केल्याचे निदर्शनास आले. हे कृत्य स्पष्टपणे पक्षविरोधी असून पक्षशिस्तीचा भंग करणारे असल्याचे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर पक्षशिस्त भंग केल्याच्या कारणावरून संतोष ढवळे (यवतमाळ विधानसभा प्रमुख) यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती जिल्हा संपर्कप्रमुख श्री राजेंद्र गायकवाड यांनी दिली.
पक्षसंघटना मजबूत ठेवण्यासाठी तसेच पक्षशिस्त अबाधित राखण्यासाठी भविष्यातही अशा प्रकारच्या पक्षविरोधी कारवायांवर कठोर भूमिका घेतली जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. या कारवाईमुळे यवतमाळच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.



