धावडा येथे भीषण अपघात; दोन चारचाकींची समोरासमोर धडक, तिघे जखमी

भोकरदन तालुक्यातील धावडा गावाजवळ रविवारी सायंकाळी भीषण अपघाताची घटना घडली. अजिंठा–बुलढाणा राष्ट्रीय महामार्गावर दोन चारचाकी वाहनांची समोरासमोर जोरदार धडक होऊन तिघेजण जखमी झाले. या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
सविस्तर वृत्त असे की, धावडा येथील अनवेकर पेट्रोल पंपासमोर सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. महिंद्रा कंपनीची चारचाकी गाडी (क्रमांक MH15 GL 7886) धावडाहून बुलढाण्याकडे जात असताना अचानक रस्त्यावर आलेल्या कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्याच वेळी बुलढाण्याकडून शिवणाकडे जाणारी होंडा कंपनीची चारचाकी गाडी (क्रमांक MH04 FR 3777) समोरून येत होती. दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक होऊन अपघात भीषण झाला.
या अपघातात रस्त्याच्या कडेला चिकन खरेदीसाठी उभा असलेला एक व्यक्तीही जखमी झाला. तसेच रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन दुचाकी वाहनांना जबर धक्का बसून त्या काही अंतरावर फरफटत गेल्या.
अपघात झालेल्या ठिकाणी महामार्गालगत खुलेआम अवैध देशी दारूची दुकाने सुरू असल्याचेही समोर आले आहे. या दुकानांमुळे परिसरात कायम गर्दी, गोंधळ व वाहतूक कोंडीचे वातावरण असते. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, याच कारणामुळे या मार्गावर वारंवार अपघात होत असून, अनेक वेळा तक्रारी करूनही अवैध दारू विक्रीवर कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीस धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, संबंधित पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन पुढील तपास सुरू केला आहे.



